खामगाव: रस्ता विस्तारीकरणाचे काम करताना नगर पालिका प्रशासनाच्या हद्दीतील दोन झाडे चक्क विनापरवागी तोडण्यात आली. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नगर पालिका प्रशासनात चांगलीच जुंपल्याचे चित्र आहे. वृक्षप्रेमीच्या कर्तव्यदक्षपणामुळे हा प्रकार उजेडात आला असून, परवानगी न देताच वृक्ष तोडल्याप्रकरणी नगर पालिका प्रशासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाला नोटीस बजावल्याची माहिती समोर येत आहे.
खामगाव शहरातून जाणाºया चिखली रस्त्याच्या विस्तारीकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने काही दिवसांपासून हाती घेतले आहे. टिळक पुतळा ते निर्मल टर्निंग पर्यतच्या रस्त्याच्या विस्तारीकरणाचे काम अतिशय संथगतीने सुरू आहे. अंदाजे अर्धाकिलोमीटर अंतराच्या या रस्त्याची दुरूस्ती अतिशय संथगतीने सुरू असून ऐन गणेशोत्सव काळातही या रस्त्याच्या दुरूस्तीकडे योग्य ते लक्ष देण्यात आले नाही. दरम्यान, रस्ता विस्तारीकरण करताना नगर पालिका प्रशासनाची परवानगी न घेताच, टिळक पुतळा ते अर्जून जल मंदिर पर्यतीची दोन झाडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने तोडण्यात आली. बुधवारी ही झाडे तोडल्यानंतर चोरी छुपेच या झाडांची वाहतूक करण्यात आली.
झाडे तोडणारा पोहोचला पालिकेत...
सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कोणत्याही प्रकारची परवानगी न घेताच दोन मोठी झाडे तोडण्यात आली. पुरावा नष्ट करण्यासाठी एका वाहनातून झाडांच्या फांद्या आणि खोडं टाकून नेली जात होती. त्यावेळी सामाजिक कार्यकर्त्याने याप्रकरणी चौकशी केली. त्यावेळी झाडे तोडणारा आणि झाडाची खोडं आणि फांदे नेणारा कामगार पालिकेकडे परवानगी साठी पोहोचला होता.
मुख्याधिकाºयांच्या अनुपस्थितीत घडला प्रकार
मुख्याधिकारी मुंबई येथील बैठकीला आणि त्यानंतर रजेवर गेल्याची संधी साधून झाडे तोडण्यात आली. झाडे तोडल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागातील जबाबदार अधिकाºयांऐवजी झाडं तोडणारालाच पालिकेत पाठविण्यात आले. त्यामुळे या प्रकरणी कुठेतरी पाणी मुरत असल्याची चर्चा आहे.
टिळक पुतळा ते अर्जून जलमंदिर पर्यंतची दोन झाडे तोडण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने कोणताही पत्रव्यवहार पालिकेशी केलेला नाही. परवानगीही घेतलेली नाही. त्याचवेळी पालिकेने झाडे तोडण्याची परवानगी दिलेली नाही. त्यामुळे याप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाला विनापरवानगी झाडे तोडण्याची नोटीस बजावली जाईल.- स्रेहल हातोले, वृक्ष अधिकारी, नगर परिषद, खामगाव.