बुलडाणा : शेतक-यांची मुले सैनिक आणि श्रमिक आहेत. त्यामुळे या तिन्ही घटकांच्या समस्या वेगळ्या नाहीत. शिवाय आर्थिकदृष्ट्या या तिन्ही घटकांची परिस्थितीही सारखी आहे. त्यामुळे यापुढे शेतकरी, सैनिक आणि श्रमिकांच्या प्रश्नासाठी संयुक्तरीत्या लढा उभारण्यात येईल, असे प्रतिपादन शेतकरी नेते विजय जावंधिया यांनी केले.नवृत्त कर्मचारी समन्वय समिती यांच्या वतीने शेतकरी, श्रमिक, सैनिक यांच्या विविध समस्यांवर चर्चा करण्यासाठी शहरात ३ एप्रिल रोजी स्थानिक जिजामाता प्रेक्षागार येथे त्रिवेणी संग्राम महासंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित शेतकरी, श्रमिक व सैनिक यांच्या ज्वलंत समस्यांवर विचारमंथन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून समन्वय समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश येंडे तर अध्यक्षस्थानी समितीचे राष्ट्रीय सचिव कमांडर अशोक राऊत होते. प्रमुख अतिथी म्हणून ओआरओपीचे नेता जनरल सतबीर सिंग, माजी महाअधिवक्ता अँड. श्रीहरी अणे, शेतकरी नेते विजय जावंधिया, वामनराव चटप, समन्वय समितीचे महामंत्री प्रकाश पाठक, श्रमिक नेता देवराव पाटील, भीमराव डोंगरे, पुंडलीकराव पांडे उपस्थित होते.प्रास्ताविकात कमांडर अशोक राऊत यांनी सांगितले, की शेतकरी, सैनिक व श्रमिक ही त्रिवेणी शक्ती या संग्राम महासंमेलनाच्या व्यासपीठावरून आता एकत्र आली असून, एकमेकांच्या समस्या सोडविण्यासाठी ते काम करणार आहेत. यावेळी राज्याचे माजी महाअधिवक्ता अँड. श्रीहरी अणे, शेतकरी नेते वामनराव चटप यांनीही शेतकर्यांच्या समस्यांवर प्रकाश टाकला. अध्यक्षीय भाषणात समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश येंडे यांनी श्रमिकांच्या समस्या मांडून, यासाठी लढा उभारण्याचे आवाहन केले. या त्रिवेणी संग्राम महासंमेलनासाठी राज्यभरातून जवळपास ७ हजार शेतकरी, सैनिक व श्रमिक उपस्थित होते.
शेतकरी, श्रमिक व सैनिकांसाठी लढा
By admin | Published: April 04, 2016 2:01 AM