मेहकर : ट्रॅक्टर व दुचाकी अपघातात शुक्रवारी तीन वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्याच्या मृत्यूला रस्ता बांधकाम करणारे कंत्राटदार व कार्यकारी अभियंता उदय बरडे जबाबदार असून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी तक्रार येथील
सामाजिक कार्यकर्ते कैलास चनखोरे यांनी पोलीस स्टेशन दिली आहे. शेगाव पंढरपूर पालखी महामार्ग अंतर्गत शहरातून रस्त्याचे काम सुरू आहे. मात्र, संबंधित कंत्राटदार व रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी यांच्या संगनमताने या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे तसेच अतिशय संथगतीने सुरू आहे. रस्त्याचे काम सुरू असताना आवश्यक असलेले सूचना फलक, पर्यायी रस्ता याबाबत कंत्राटदाराने कुठलीच काळजी घेतलेली नाही. सदर बाबींमुळे शुक्रवारी धोंडगे कॉम्प्लेक्सजवळ ट्रॅक्टर व दुचाकीचा अपघात होऊन मोळा येथील करण धोटे या तीन वर्षांच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे या रस्त्याच्या कामादरम्यान देखरेखीची जबाबदारी असलेले रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता उदय बरडे व संबंधित कंत्राटदार यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी कैलास चनखोरे यांनी केली आहे.