लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या बुलडाणा जिल्हा दौऱ्यादरम्यान खामगाव आणि शेगावसह विविध ठिकाणी कोविड नियमांचे उल्लंघन झाल्याप्रकरणी अनेक जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आल्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.प्रदेशाध्यक्ष नाना पटोले १० जून रोजी बुलडाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. दुपारनंतर खामगाव येथे पटोले पथकासह दाखल झाले. दरम्यान, काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या स्वागतासाठी नांदुरा रोडवरील संत तुकाराम मंगल कार्यालयात सत्कार आणि मेळावा घेतला. यामध्ये २०० पेक्षा अधिक कार्यकर्ते आणि पदाधिकारी जमले. त्यामुळे या मेळाव्यात कोविड नियमांचे उल्लंघन झाल्याने शहर पोलीस स्टेशनचे पीएसआय ईश्वर बळीराम सोळंके (३४)यांनी शहर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली.तक्रारीत नमूद केले की, १० जून रोजी दुपारी ४.३० ते ५.५० वाजेपर्यंत नांदुरा रोडवरील संत तुकाराम महाराज मंगल कार्यालय येथे माजी आमदार दिलीपकुमार सानंदा, तुषार चंदेल, सदानंद धनोकार, नगरसेवक किशोर भोसले, प्रमोद महाजन, उत्तम माने, राजाराम काळणे, म.नवेद अशपाक ऊर्फ बबलू पठाण, शांताराम पाटेखेडे सर्व रा. खामगाव तसेच पंजाबराव देशमुख रा.साई नगर वाडी, निखिल देशमुख रा.वाडी आणि इतर १५ ते २० व्यक्तींनी प्रशासनाची पूर्व परवानगी न घेता व सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करता कोरोना विषाणूचा संसर्ग वाढीस लागू शकतो व त्याकरिता स्वत: कारणीभूत होऊ शकतात,असे माहीत असताना सुद्धा काँग्रेस पक्षाचा कार्यक्रम आयोजित केला. सुमारे २५० ते ३०० लोकांना एकत्र करून सत्कार व इतर कार्यक्रम घेतला. या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी उपरोक्त व्यक्तींविराेधात भादंवि कलम १८८, २६९, २७०, सहकलम ५१(ब) आपत्ती व्यवस्थापन कायदा, कलम ३ साथ रोग अधिनियम नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास एपीआय नीलेश सरदार करीत आहेत.
शेगावात नानांचा सत्कार भोवला! खामगाव येथे कार्यक्रम आटोपल्यानंतर नाना पटोले शेगाव दौऱ्यावर गेले. तेथेही कोविड आपत्ती व्यवस्थापन नियमांचा भंग करून पटोले यांच्या सत्काराचा कार्यक्रम घेण्यात आला. त्यामुळे शेगाव शहर पोलिसांनी दिलीप सलामपुरीया, विजय काटोले, रामविजय बुरुंगले, दयाराम वानखडे, शैलेंद्र पाटील, मो. जुबेर शे. अब्दुल्ला, असलम खान, पवन परचेलवाल, फिरोज खान, दिलीप पटोकार, ज्ञानेश्वर पाटील, सलमान रजा, असलम शेख, कैलास देशमुख, ज्ञानेश्वर शेजाेळे, अनिल सावळे, पांडुरंग पाटील यांच्यासह १०-१२ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.