ऑनलाइन लोकमत
खामगाव (बुलडाणा), दि. 4 : राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी आरोग्य मंत्री आणि आदिवासी विकास मंत्र्यांविरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. बुलडाणा येथील आश्रम शाळेतील अल्पवयीन मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणी चित्रा वाघ यांनी स्थानिक नेत्यांसह आश्रम शाळेला भेट दिली आणि घटनास्थळाची पाहणी केली.
यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आरोग्य मंत्री आणि आदिवासी मंत्र्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. केवळ खामगावातीलच नव्हे तर राज्यातील सर्वच आदिवासी आश्रम शाळांची अवस्था अतिशय दयनिय असल्याचे त्यांनी सांगितले. पीडित मुलीच्या वैद्यकीय चाचणीत झालेल्या हलगर्जीपणामुळे त्यांनी ही मागणी केली आहे. पीडित मुलीची वैद्यकीय चाचणी महिला वैद्यकीय अधिका-यांमार्फत करणे अपेक्षित असताना हॉस्पिटलमधील पुरुष वैद्यकीय अधिका-यांनी तिची चाचणी केली.
यावर प्रशासकीय यंत्रणांवर नियंत्रण कुणाचे? असा प्रश्न उपस्थित करत चित्रा वाघ यांनी घडल्या प्रकारावर चिंता व्यक्त केली.
आदिवासी भागातील कुपोषणाची समस्या आणि त्यांच्यावरील वाढत्या अत्याचारांच्या घटना टाळण्यासाठी शासनाची प्रचंड उदासीनता दिसू येत असल्याचीही टीका त्यांनी केली आहे. मुख्यमंत्री दोषी मंत्र्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोपदेखील त्यांनी यावेळी केला आहे. शिवाय महाराष्ट्र घडत नसून बिघडत असल्याची बोचरी टीकाही त्यांनी केली.