बुलडाणा: अवैधरीत्या गर्भपाताची औषधे विक्री केल्याप्रकरणी बुलडाणा शहरातील मनीष मेडिकल ॲन्ड जनरल स्टोअर्सच्या मालकाविरोधात बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. १२ जुलै रोजी या मेडिकल स्टोअर्सची अन्न व औषध प्रशासन विभागाने तपासणी केली होती. त्यावेळी ही बाब उघड झाली आहे.
गर्भपातासाठी वापरण्यात येणाऱ्या एमटीपी किट अवैधरीत्या खरेदी करून त्यांची विक्री होत असल्याची गोपनीय माहिती अन्न व औषध प्रशासन विभागास मिळाली होती. त्या आधारावर येथे तपासणी करताना त्यामध्ये सत्यता आढळून आली. प्रकरणी मनीष मेडिकल स्टोअर्सचे इंगळे यांच्याविरोधात अन्न व औषध प्रशासन विभागाने पोलिसात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तपासणी करतेवेळी आणखी एक व्यक्ती तेथे होता. त्याच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दुकानातून एकूण पाच किट जप्त करण्यात आल्या आहेत. प्रकरणाचा पुढील तपास बुलडाणा शहर पोलीस करीत आहेत. दरम्यान, उपरोक्त कारवाई अमरावती विभागाचे सहआयुक्त (औषधे) यू. बी. घरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त अशोक बर्डे, औषध निरीक्षक गजानन घिरके यांनी केली.