तालुक्यातील कोऱ्हाळा ग्रामपंचायतीची एकूण नऊ सदस्यसंख्या असून, यातील एक सदस्यपद रिक्त आहे. येथे ७ ऑक्टोबर २०१७ रोजी निवडणूक झाली होती. यावेळी सरपंच श्रीकृष्ण सुपडा सोनोने यांची जनतेतून सरपंचपदी निवड झाली. दरम्यान, येथील ७ सदस्यांनी सरपंच श्रीकृष्ण सोनोने यांच्याविरुद्ध गुरुवारी मोताळा तहसीलदारांकडे अविश्वास प्रस्ताव दाखल केला. सरपंच श्रीकृष्ण सोनोने हे विकासकामांत सदस्यांना विश्वासात न घेता मनमानी कारभार करतात. महिला सदस्यांना विश्वासात न घेता अधिकारांचा दुरूपयोग करतात आदी कारणे अविश्वास प्रस्तावात नमूद केली आहेत. या अविश्वास प्रस्तावावर ग्रा. पं. सदस्य संगीता गजानन बोडखे, गजानन रामशंकर बच्छे, गणेश भागवत टेकाडे, नंदाबाई रामदास बांगर, सयाबाई पंढरी इंगळे, सीमा शिवाजी तायडे, इंदूबाई रामशंकर वाघ या सात सदस्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. २५ जानेवारीला दुपारी २ वाजता कोऱ्हाळा ग्रा. पं. कार्यालयात या अविश्वास प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी सभा बोलावण्यात आली आहे. या सभेत सरपंच श्रीकृष्ण सोनोने यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्ताव पारित झाल्यास त्यानंतर ग्रामसभा बोलावण्यात येणार आहे. ग्रामसभेत गावातील मतदारांनी सरपंचांवरील अविश्वास प्रस्तावाला बहुमताने मंजुरात दिल्यानंतर सरपंच सोनोने यांना सरपंचपदावरून पायउतार करण्यात येऊ शकते, असे तहसीलदार एस. एम. चव्हाण यांनी सांगितले आहे.
कोऱ्हाळा येथील सरपंचाविरूद्ध अविश्वास प्रस्ताव दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 4:31 AM