जळगाव जामोद (जि. बुलडाणा ) : तालुक्यातील बांडा पिंपळ शिवारात जळगाव जामोद येथील गोपालकृष्ण गोरक्षण संस्थानचे अध्यक्ष मोदी यांच्यासह संस्थेच्या इतर संचालकाविरुध्द वन विभागाने वन कायद्यानुसार १0 ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल केला आहे. जळगाव जामोद येथील गोपालकृष्ण गोरक्षण संस्थानच्या गायींचा बांडा पिंपळ शिवारात मृत्यू झाल्यामुळे ही घटना चर्चेचा विषय ठरत आहे. तसेच या प्रकरणी गोरक्षण संस्थेने बिना परवाना १00 गाई (मृत्यू पावलेल्या वगळून) बेकायदा जंगलात चराईसाठी नेल्याने कारणावरुन सामाजिक वनपरिक्षेत्र अधिकारी शेगोकार यांनी वनअधिनियमानुसार गोपालकृष्ण संस्थेचे अध्यक्ष मोदी व संचालक मंडळाविरुध्द वनविभागाकडे फिर्याद दिली. या फिर्यादीवरुन वनविभागाने गोपालकृष्ण गोरक्षण संस्थानचे अध्यक्ष मोदी यांच्याविरुध्द वन अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे. गाईंना चारा नसल्याने त्यांची उपासमारी होऊन अशक्त झाल्याने ५८ गायींचा मृत्यू झाला होता. तर उपचारा दरम्यान आणखी एक गाय दगावली. त्यामुळे हा आकडा ५९ झाला आहे. तसेच इतर गायी सुध्दा अत्यवस्थ असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. दरम्यान १0 ऑगस्ट रोजी जि.प.चे उपकार्यपालनाधिकारी हजारे यांनी बीडीओ जोशी, चोपडे पशुसंवर्धन अधिकारी कडून याप्रकरणी माहिती घेतली.
गोरक्षण संस्थाध्यक्षाविरुद्ध गुन्हा दाखल
By admin | Published: August 11, 2015 11:51 PM