यासंदर्भाने गाडेकर यांनी पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागात जास्त प्रादुर्भाव असल्याचे निदर्शनास आले. या काळात आरोग्य विभागावर प्रचंड ताण आहे. कोरोनाच्या रुग्णांना औषध उपचार करणे आणि लसीकरण करणे, याशिवाय इतर रुग्ण व दैनंदिन लसीकरण या कामासाठी डॉक्टर व आरोग्य कर्मचारी अहोरात्र झटत आहेत; परंतु मंगरुळ नवघरे याठिकाणी काेट्यवधी रुपये खर्चून तयार असलेली सुसज्ज आरोग्य केंद्राची इमारत केवळ कर्मचाऱ्यांच्या अभावाने धूळ खात पडलेली आहे. त्याठिकाणी कर्मचारी उपलब्ध असते तर अनेकांना या काळात स्थानिक पातळीवर वैद्यकीय सुविधा मिळाली असती. यासह एकलारा प्राथमिक आरोग्य केंद्रावर अनेक दिवसांपासून मेडिकल ऑफिसर सुट्टीवर आहेत. त्यामुळे या केंद्रावरील उपलब्ध डॉक्टरांवर ताण येऊन कोरोनाच्या काळात रुग्णांना आवश्यक ते औषध उपचार मिळत नाहीत, तसेच आरोग्य केंद्रातील मलेरिया डॉक्टर, एल.एच.व्ही., लिपिक ही पदे गत चार वर्षांपासून रिक्त असल्याने ग्रामीण जनतेची मोठी हेळसांड होत आहे. याची दखल घेत ही रिक्त जागा तातडीने भरून रुग्णांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी गाडेकर यांनी केली आहे.