बुलडाणा : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाने अंतिम वर्ष/ सत्राच्या परीक्षा ऑनलाईन घेण्याचा निर्णय घेतला आहे. या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार १ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान या परीक्षा घेण्यात येणार आहेत. दीड तासांचा विद्यार्थ्यांना वेळ देण्यात आला आहे. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाने ऑफलाईन परीक्षा घेण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला होता. या प्रस्तावाला मान्यता न मिळाल्याने विद्यापीठाने ऑनलाईन परीक्षा घेण्याचे नियोजन केले आहे. त्यानुसार १८ सप्टेंबर रोजी विद्यापीठाने परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. ५ ऑक्टोबर पासून परीक्षांना सुरूवात होणार आहे. तसेच ही परीक्षा ३१ ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे.
नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निकाल जाहीर करण्याचे विद्यापीठाचे नियोजन आहे. ऑनलाईन परीक्षेत विद्यार्थ्यांना ५० टक्के प्रश्न सोडवावे लागणार आहेत. तसेच विद्यार्थ्यांना घरबसल्या मोबाईलवरून परीक्षा देण्याची सुविधा विद्यापीठाने दिली आहे.दरम्यान, विद्यापीठाने प्रश्नपत्रिका तयार करण्यासाठी ऑनलाईन लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर विविध महाविद्यलयातील प्राध्यापक प्रश्न तयार करून देत आहेत. ऑनलाईन परीक्षांचे नियोजन पूर्ण झाले आहे. तसेच अभियांत्रिकीचे प्रात्याक्षिक ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येत आहे. इतर शाखांच्या विद्यार्थ्यांचेही प्रात्याक्षिक परीक्षा सुरू झाल्यास असून ३० सप्टेंबरपर्यंत त्या पूर्ण करावे लागणार आहेत.
नेटवर्कची समस्या विद्यापीठाने ऑनलाईन परीक्षा घेण्याचे नियोजन केले असले तरी ग्रामीण भागात नेटवर्कची समस्या आहे. अनेक गावांमध्ये मोबाईलचे नेटवर्क नसल्याने परीक्षा द्यावी कशी, असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे. विद्यापीठाने मोबाईल नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी जवळच्या महाविद्यालयात ऑफलाईन परीक्षा देण्याची व्यवस्था केली आहे. मात्र, अनेक गावात नेटवर्क राहत नसल्याने विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहण्याची भिती व्यक्त होत आहे.