संदीप वानखडे, बुलढाणा : पवित्र पाेर्टलवरील १९६ व्यवस्थापनाच्या शिक्षक भरतीस पुन्हा प्रारंभ झाला आहे. उमेदवारांनी आधी दिलेले प्राधान्य तांत्रिक अडचणीमुळे रद्द करण्यात आले असून, आता नव्याने १३ एप्रिलपासून प्राधान्यक्रम लाॅक करण्यास प्रारंभ झाला आहे. याविषयी ‘लाेकमत’ने पाठपुरावा केला हाेता. २५ एप्रिलपर्यंत उमेदवारांना प्राधान्यक्रम लाॅक करता येणार आहेत. सन २०१७ मध्ये शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दिलेल्या उमेदवारांसाठीच ही भरती पक्रिया आहे.
पवित्र पाेर्टलमार्फत १९६ व्यवस्थापनांच्या रिक्त पदांसाठी १५ नाेव्हेंबर २०२२ ते ७ डिसेंबर २०२२ या दरम्यान उमेदवारांकडून प्राधान्यक्रम घेण्यात आले हाेते. परंतु तांत्रिक कारणामुळे त्यावर पुढील प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. त्यामुळे या व्यवस्थापनांसाठी उमेदवारांकडून नव्याने प्राधान्यक्रम घेण्यात येत आहे. यापूर्वी प्राधान्यक्रम नाेंदविलेल्या उमदेवारांनाही नव्याने प्राधान्यक्रम देण्याची नाेंद करणे आवश्यक आहे. गत काही महिन्यांपासून ही भरती प्रक्रिया रखडली हाेती, आता पवित्र पाेर्टल सुरू झाल्याने भावी शिक्षकांना माेठा दिलासा मिळाला आहे. प्राधान्यक्रम लाॅक केल्यानंतर इयत्ता ६ वी ते १२ वी या गटातील रिक्त पदांसाठी मुलाखत आणि अध्यापन कौशल्यासाठी १:१० असे उमेदवार उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच प्राधान्यक्रम लाॅक करण्याची २४ एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
स्व-प्रमाणपत्र अपडेट करणे आवश्यक
पवित्र पाेर्टल ७ जुलै २०२२ राेजी स्व-प्रमाणपत्र अपडेट करण्याविषयी सूचना देण्यात आल्या हाेत्या. उमेदवारांनी स्व-प्रमाणपत्र अपडेट केलेले आहेत. ज्या उमेदवारांनी ते अपडेट केले नाही किंवा तांत्रिक कारणामुळे काही उमेदवारांचे स्व-प्रमाणपत्र अपडेट दाखवत नसेल त्यांनी ते करून घेण्याची सूचना देण्यात आली आहे. स्व-प्रमाणपत्र अपडेट केल्याशिवाय प्राधान्यक्रम येणार नसल्याचे पवित्र पाेर्टलवर आलेल्या सूचनांमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"