खामगाव: तालुक्यातील घाटपुरी येथील गणेश काळे नामक युवकाचा मृतदेह संशयास्पद रित्या आढळून आला होता. प्रथमदर्शनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. मात्र, मृतकाच्या भावाच्या तक्रारीवरून शहर पोलीसांनी अखेर एका आरोपी विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला. आरोपीस अटक करण्यात आली.
याप्रकरणी घाटपुरी येथील संतोष नारायण काळे यांनी शहर पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीत नमूद केले की, त्यांचा भाऊ गणेश याने पैसे देण्याचे सांगितल्याने त्यांनी आरोपी गणेश दशरथ घोगरे याला २३ हजार रूपये दिले. मात्र, त्यानंतर भावाने बोलणे झाले नसताना आरोपीला पैसे दिले म्हणून तक्रारदार संतोष काळे आणि त्याचा मृतक भाऊ आरोपीला पैसे मागण्यासाठी आरोपीच्या घरी गेले. त्यावेळी आरोपीने सद्या आपल्या जवळ पैसे नसून, नंतर देण्याचे सांगितले. त्यामुळे दोघे भाऊ परत आले.
दरम्यान, शनिवारी शेगाव रोडवरील एका हॉटेलात आरोपी आणि मृतक दारू पिण्यास गेले. तेथे पुन्हा दोघांमध्ये पैशावरून वाद घातला. त्यावेळी आरोपी गणेश घोगरे याने पैसे देण्यास नकार देत, तू मर असे म्हटल्याचा आरोप तक्रारीत केला. या तक्रारीवरून शहर पोलीसांनी आरोपी गणेश घोगरे याच्या विरोधात भादंवि कलम ३०६ अन्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास खामगाव शहर पोलीस करीत आहेत.
आरोपीच्या अटकेसाठी ठिय्या
आरोपीच्या त्रासामुळेच मृतकाने आत्महत्या केली. घटनेपूर्वी एका हॉटेलात आरोपी आणि इतर तीन जणांनी मृतकाशी वाद घातला. पोलीसांनी आरोपीला तत्काळ अटक करावी,यासाठी मृतकाचे नातेवाईक रविवारी शहर पोलिस स्टेशनमध्ये ठाण मांडून होते.