बुलडाणा : लाेणार तालुक्यातील अंजनी खुर्द येथील जनता विद्यालयाला बनावट कागदपत्रांच्या आधारे हिंदी भाषिक अल्पसंख्या विभागाचा दर्जा मिळविल्याप्रकरणी दाेषीवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी १७ जून राेजी दिले आहेत. यापूर्वी शिक्षणाधिकाऱ्यांनी आदेश देऊनही मुख्याध्यापकांनी कुठलीही कारवाई केली नाही. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी पुन्हा आदेश दिले आहेत.
तत्कालीन शिक्षणाधिकारी पानझडे यांनी २५ जून, २०२० राेजी मुख्याध्यापक, जनता विद्यालय अंजनी खुर्द व इतर यांना बनावट दाखले तयार करून सादर करणाऱ्या दोषी व्यक्तीवर फोजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले होते, तसेच फाैजदरी कारवाई न झाल्यास वेतन व भत्ते थाबवून शिक्षणाधिकारी कार्यालयामार्फत फौजदारी कारवाई करण्याचा इशारा दिला हाेता. तरीही संबंधित मुख्याध्यापक यांच्याकडून गुन्हे दाखल न झाल्याने शिक्षणाधिकारी यांना तातडीने गुन्हे दाखल करण्याचे आदेश देऊन अनुपालन अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
अंजनी खुर्द येथील जनता विद्यालयाला अध्यक्ष व संचालकांनी बनावट कागदपत्रे सादर करून, अल्पसंख्या दर्जा मिळविल्याची तक्रार केशरबाई गायकवाड यांनी केली हाेती. या प्रकरणी माध्यमिक शिक्षण विभागाच्या वतीने चाैकशी करण्यात आली हाेती. चाैकशीत बनावट कागदपत्रे सादर करून अल्पसंख्याक दर्जा प्राप्त केल्याचे समाेर आले हाेते. त्यामुळे दाेषीवर फाैजदारी कारवाई करण्याचे आदेश माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी जनता विद्यालयाच्या मुख्याध्यापकांना दिले हाेते. संबंधित मुख्याध्यापकांनी कुठलीही कारवाई न केल्याने, तक्रारकर्त्या गायकवाड यांनी पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली हाेती. या तक्रारीवरून जिल्हाधिकाऱ्यांनी १७ जून राेजी शिक्षणाधिकाऱ्यांना दाेषीवर फाैजदारी कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.