जानेफळ: ‘कोरोनाचा जानेफळ येथे उद्रेक तर स्थानिक प्रशासन मात्र निद्रेत’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने ५ मार्च, २०२१ रोजी बातमी प्रकाशित करताच खळबळून जागे होत, स्थानिक प्रशासनातील सर्वच अधिकारी व कर्मचारी यांनी जानेफळ येथे दाखल झाले, तसेच विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई केली.
तहसीलदार डॉ.संजय गरकल यांच्या मार्गदर्शनाखाली २५ फेब्रुवारी, २०२१ रोजी जानेफळ येथे झालेल्या रुटमार्चला हजेरी लावून फोटोसेशननंतर गायब झालेल्या स्थानिक प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोनाचे थोडेही गांभीर्य वाटत नव्हते. जानेफळ येथे कोरोनाचे मोठ्या प्रमाणात रुग्ण निघत असल्यामुळे, कोरोनाचे हॉटस्पॉट झाल्यानंतरही बेजबाबदारपणाचा कळस गाठणारे स्थानिक प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी जानेफळ येथे फिरकत नव्हते. ‘लोकमत’ याविषयी बातमी प्रकाशित करताच, ५ मार्च, २०२१ रोजी सकाळपासूनच स्थानिक प्रशासनातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी जानेफळ येथे भेट दिली, तसेच विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांविरुद्ध दंडात्मक कार्यवाही केली, तसेच स्थानिक ग्रामपंचायतने निर्णय घेतल्यानुसार, दुपारी ३ वाजता सर्व व्यापारपेठ बंद केली.