डोणगाव प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत सध्या लसीकरण मोहीम युद्ध पातळीवर सुरू आहे; परंतु गत शनिवारपासून डोणगाव येथे लस उपलब्ध नसल्याने नागरिकांना प्राथमिक आरोग्य केंद्रातून परत जावे लागत हाेते. त्यामुळे लोकमतने डोणगाव येथे लसीचा तुटवडा अशा आशयाचे वृत्त प्रकाशित करताच गुरुवारी डोणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये ३०० लसीचे डोस प्राप्त झाले. वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल गवई व कर्मचारी यांनी फिजिकल डिस्टन्स व कोविड नियमांचे पालन करीत लसीकरणाला सुरुवात केली. एका दिवसात २०० जणांना लसीकरण करण्यात आले. डोणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये २०० कोविशिल्ड तर १०० कोव्हॅक्सिनचे डोस प्राप्त झाले आहेत. हे डोस ४५ वर्षांपुढील व १८ ते ४४ वर्षांपर्यंतच्या व्यक्तींना देण्यात येत आहेत. सर्वांनी लसीकरण करून घेण्याचे आव्हान वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल गवई यांनी केले आहे.
लसीकरण स्थळी केली मोफत फराळाची व्यवस्था
डोणगाव येथे लसीकरण करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात सकाळपासून ग्रामीण भागातून ग्रामस्थ येतात. त्यांना येथे लसीकरण होईपर्यंत उपाशीपाेटी थांबावे लागते. डोणगाव येथील संताजी मंडळाचे अध्यक्ष तथा सिव्हिल इंजिनिअर विनोद बोडगे यांनी लसीकरणासाठी ग्रामस्थांसाठी नाश्त्याची व्यवस्था केली. डोणगाव येथील इतरही सेवाभावी संघटनांनी त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन मदत देण्याची गरज आहे.