लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: खामगाव-बुलडाणा-अजिंठा महामार्गासाठी तब्बल ७०२९.२५ ब्रास मुरूमाचे अवैध उत्खनन झाल्याचे अखेर निष्पन्न झाले. त्यामुळे खामगाव महसूल प्रशासनाने संबंधितांना सात कोटी एकतीस लाख चार हजार दोनशे रुपयांचा दंड ठोठावला आहे. त्यामुळे संबंधितांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
खामगाव-बुलडाणा-अंजिठा रस्ता बांधकामाचा कंत्राट ‘जान्दू’ कन्स्ट्रक्शन कंपनीने घेतला आहे. खामगाव ते बुलडाणा रस्ता बांधकाम करताना या कंपनीने रोहणा शिवारातील गट नं.९२ मधील ३.२० हे.आर भाडेतत्वावर करारनामा करून घेतली आहे. येथे ‘जांन्दू’ने मिक्सींग प्लांन्टही उभारला आहे. या जमिनीपैकी ०.४० हे.आर क्षेत्रावर गौणखनिजाचे अवैध उत्खनन करण्यात आले आहे. तलाठ्याशी संगनमत करून तब्बल सात हजार ब्रासपेक्षा अधिक उत्खनन झाल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेल्या तांत्रिक तपासणीत उघड झाले. त्यानंतर महसूल प्रशासनाने संबंधितांना ७ कोटी, ३१ लक्ष,०४, २०० रुपयांचा दंड ठोठावला आहे.
असा झाला ७ कोटींचा दंड
महाराष्ट्र जमिन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४८(७) अन्वये सदर गौण खनिजाचे बाजार मुल्य २०००/-रुपये प्रतीब्रास प्रमाणे पाचपट रक्कम (१००००* ७०२९.२५ ब्रास= ७, ०२, ९२,५०० रुपये दंड) आणि ७०२९.२५ ब्रास मुरूमाची रॉयल्टी(स्वामित्व धन) २८, ११७०० असा दंड ठोठावण्यात आला.
अकृषक वापर प्रकरणीही ठोठावला होता दंड!
- रोहणा शेत शिवारातील गट नं. ९२ मधील ३.२० हे.आर शेतजमिनीचा अकृषक म्हणून वापर केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर ‘जान्दू’ कन्स्ट्रक्शन कंपनीला नोव्हेंबर-२० मध्ये महसूल प्रशासनाने एक लक्ष २४ हजार रुपयांचा दंड ठोठावला होता. त्यानंतर उपरोक्त शेतशिवारात अवैध उत्खनन केल्याप्रकरणी ७ कोटींचा दंड ठोठावला आहे. अवैध उत्खनन प्रकरणी ‘लोकमत’ने केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश मिळाले आहे.
रोहणा शेत शिवारातील गट नं. ९२ मध्ये सात हजारापेक्षा अधिक ब्रासचे अवैध उत्खनन झाल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी संबंधितांना नियमानुसार दंड ठोठावण्यात आला आहे. तशी नोटीस संबंधितांना देण्यात आली आहे.
-डॉ. शितल रसाळ, तहसीलदार, खामगाव.