लोकमत न्यूज नेटवर्कसिंदखेडराजा : तालुक्यातील साखरखेर्डा येथील त्रिमूर्ती अँग्रो सर्व्हिस या कृषी सेवा केंद्राला ११ जानेवारी रोजी सकाळी ६ वाजता शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या आगीत किमान ५0 लाखांचे नुकसान झाले आहे.चिखली येथील रहिवासी गोविंद पुरुषोत्तम गुळवे यांचे साखरखेर्डा येथे त्रिमूर्ती अँग्रो सर्व्हिसचे दुकान असून, या दुकानाला सकाळी ६ वाजताच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या आगीत कीटकनाशक औषधे, मोटारपंप, स्प्रिंकलर पाइप, कॉम्प्युटर यासह दुकानातील सर्व फर्निचर जळून खाक झाले. आग लागल्याची माहिती कोंडिबा जाधव यांनी पोलिसांना दिली. तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले. गावातील सर्व पाण्याचे टँकर तातडीने बोलावून आग विझविण्याचा प्रयत्न झाला. सरपंच महेंद्र पाटील, साहेबराव काटे महाराज, राजू काटे, विजय तांगडे, पुरुषोत्तम मानतकर, विनायक गायकी, सतीश तुपकर, अनंता शेळके यांनी धाव घेत दोन तासांमध्ये आगीवर नियंत्रण मिळविले. बाजूलाच विवेक जोशी यांच्या घराचेही या आगीमुळे नुकसान झाले. दुकानातील आणि घरातील सिलिंडर युवकांनी बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला.
साखरखेर्डा येथे कृषी केंद्राला आग; ५0 लाखांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 1:38 AM