बुलडाणा : तालुक्यातील देऊळघाट येथील शासकिय आयुर्वेदिक रुग्णालयास आग लागल्याने महत्वाच्या कागदपत्रांसह इतर साहित्य खाक झाल्याची घटना रविवारी दुपारी एक वाजताच्या दरम्यान घडली. सुटीमुळे दवाखाना बंद असल्याने मोठा अनर्थ टळला. ंशॉर्ट सर्किट किंंवा दवाखान्याच्या मागील बाजूचा काडीकचरा जाळल्यामुळे आग लागली असावी, असा अंदाज मंडळ अधिकाºयांनी बोलून दाखविला. अद्याप पंचनामा झाला नसल्याने नुकसानाची नेमकी माहिती कळू शकली नाही. देऊळघाट ग्रामपंचायतला लागूनच शासकिय आयुर्वेदिक दवाखान्याची इमारत आहे. रविवार सुटी असल्याने दवाखाना बंद होता. ुदुपारी साधारण १ वाजताच्या दरम्यान दवाखान्याच्या खिडकीतून आगीचा धूर निघत असल्याचे नागरिकांना दिसले. हळूहळू आगीचे प्रमाण वाढले. नागरिकांनी तत्काळ दवाखान्याकडे धाव घेतली. टँकरच्या पाण्याने आग विझविण्याचे प्रयत्न सुरु केले. बुलडाणा नगर पालिकेच्या अग्निशमन विभागास आगीची माहिती देण्यात आली. काही वेळातच अग्निशमन विभागाचे वाहन घटनास्थळी दाखल झाले व कर्मचाºयांनी आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत दवाखान्यातील तीन खोल्यांमधील महत्वाची कागदपत्रे, औषधी व इतर साहित्य खाक झाले. दवाखान्याचा समोरील लोखंडी दरवाजा तोडावा लागला. मंडळ अधिकारी राऊत यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानाची पाहणी केली. वृत्त लिहेपर्यंत पंचनामा झाला नसल्याने नुकसानाची नेमकी माहिती कळू शकली नाही.
सुटीमुळे मोठा अनर्थ टळला
देऊळघाट येथील शासकिय आयुर्वेदिक रुग्णालयात रुग्णांची गर्दी असते. सध्या उन्हाची तीव्रता वाढल्याने आजारात वाढ झाली आहे. त्यामुळे रुग्णांची संख्या वाढलेली आहे. जर वर्दळ असतांना रुग्णालयास आग लागली असती तर मोठा अनर्थ घडला असता. मात्र रविवारी दवाखान्यास सुटी असल्याने हा अनर्थ टळला. तर दवाखान्याच्या आजूबाजूस असलेल्या वस्तीपर्यंत आगीची झळ पोहोचली नाही. अन्यथा मोठे नुकसान झाले असते. आगीच्या घटनांत दिवसेंदिवस वाढ होत असून प्रशासनाने ही बाब गांभिर्याने घेण्याची गरज आहे.