लोकमत न्यूज नेटवर्करुईखेड मायंबा: बुलडाणा तालुक्यातील मौजे भडगाव (मायंबा) शिवारात ४ मे रोजी गट नं. २७२ आणि २७३ मध्ये अनुक्रमे द्वारकाबाई पाटीलबा जंजाळ आणि गणेश फकिरबा जंजाळ यांच्या मालकीच्या गोठ्यास, राहत्या घरास विद्युत तारेच्या घर्षणामुळे आग लागून अंदाजे सात लक्ष रुपयाचे नुकसान झाले.चार मे रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास द्वारकाबाई जंजाळ आणि गणेश जंजाळ यांच्या गोठ्यास आग लागली, त्यात द्वारकाबाई जंजाळ यांचा एक बैल ठार तर एक बैल, एक गाय आणि दोन वासरे गंभीर जखमी झाले. त्यासोबतच शेती उपयोगी साहित्य, धान्य असा एकूण ३ लाख ३० हजार रुपयांचे तसेच गणेश जंजाळ यांचे संसार उपयोगी साहित्य, जमीन विक्रीतून आलेले ३ लाख, टीन पत्रे असे एकूण ३ लाख ४८ हजार अशी एकूण ७ लाख रुपयाची हानी दोन्ही आगीमध्ये झाली.पंचनामा भडगाव (मायंबा) येथील तलाठी संजय जगताप यांनी करून शासनास तशी माहिती दिली. यावेळी तंटामुक्ती अध्यक्ष मदन साखरे, राहुल साखरे, श्रीधर साखरे आदींची उपस्थिती होती. या घटनेमुळे दोन्ही कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली असून, शासन स्तरावर मदतीची गरज आहे.दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात आगीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. प्रामुख्याने गुरांच्या गोठ्यांना आगी लागण्याच्या घटना अधिक आहेत. त्यामुळे शेतकºयांच्या पशुधनाची हानी होत आहे. याबाबत आगीपासून गोठ्यांचे तथा शेती साहित्याचे कसे संरक्षण करावे, याबाबत शेतकºयांमध्ये जाणीव जागृती निर्माण करण्याची गरज आता निर्माण झाली आहे.
दोन्हीही शेतक-यांची आर्थिक स्थिती बेताचीच आहे. शासन स्तरावर मदतीसाठी राज्याचे कृषिमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नक्कीच लक्ष देतील.- मदन साखरेमहात्मा गांधी तंटामुक्त समितीभडगाव (मायंबा)