खामगाव - सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही रात्री आठ ते दहा वाजेपर्यंत फटाके फोडण्यात आल्याचा प्रकार बुधवारी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घडला. राज्य सरकारने केलेल्या फटाके मुक्त दिवाळी च्या अहवालाकडे नागरिकांनी डोळेझाक केल्याचे आढळून आले. धनत्रयोदशीच्या दिवशी ट्रॉम्बे येथील सोसायटीमध्ये दोन युवकांनी फटाके फोडल्याच्या कारणावरून पोलिसांनी गुन्हे दाखल केल्याची कारवाई केली होती. त्यानंतर तरी नागरिकांमध्ये जागृती होऊन फटाके फोडण्यावर काही प्रमाणात बंदी येईल असे वाटले होते. मात्र लक्ष्मीपूजनाच्या दिवशी फटाके फोडण्यावर कोणत्याही प्रकारचा प्रतिबंध दिसून आला नाही.बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा, खामगाव, शेगाव, मलकापूर, संग्रामपूर, जळगाव तालुक्यामध्ये रात्री दहा ते बारा वाजेदरम्यान फटाक्यांची आतषबाजी सुरूच असल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे बुलढाणा पोलिस अधीक्षक दिलीप भुजबळ पाटील यांनी पोलिस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पथके सुद्धा नेमली होती. रात्री 10 वाजेनंतर फटाके फोडण्यावर प्रतिबंध आणण्यासाठी हे पथक कार्यान्वित केले होते. मात्र दिवाळीच्या दिवशी काही तालुक्यात एकही पथकाने काही ठिकाणी कारवाई केली नसल्याचे दिसून आले. यावरून राज्य शासनाच्या आदेशाचा पोलीस प्रशासनाला विसर पडला तर नागरिकांनी कुठलाही प्रतिसाद दिला नसल्याचे आढळून आले.
खामगावात रात्री 10 वाजेनंतर फटाक्यांची आतषबाजी सुरूच
By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2018 12:44 AM