लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्ह्याचे वैभव असलेल्या ज्ञानगंगा अभयारण्यात शुक्रवारी दुपारी पेटलेल्या वणव्यामुळे अभयारण्यातील हजारो हेक्टरवरील वनसंपदा नष्ट झाली आहे. या वणव्यामुळे अभयारण्यातील जैवविविधतेलाही मोठा फटका बसला आहे.शुक्रवारी खामगाव रेंजमधील पलढग बिटमध्ये हा वणवा पेटला. तो विझविण्यासाठी प्रयत्न झाले; पण तो आटोक्यात आला नाही. उलट तो आणखी वाढतच गेला. रात्रभर ज्ञानगंगा अभयारण्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले होते. पहाटेच्या वाºयामुळे वणवा अधिकच भडकला असून, सध्या पलढग, उत्तर देव्हारी व बोरखेड या तीन बिटमधील वनसंपदा आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहे. ही आग आटोक्यात आणणे अवघड होऊन बसले आहे.ज्ञानगंगा अभयारण्य हे २०४ चौरस किमी विस्तारलेले असून, बुलडाणा, चिखली, मोताळा आणि खामगाव तालुक्याच्या सीमावर्ती भागात व्यापलेले आहे. प्रामुख्याने बिबट व मोठ्या संख्येने असलेल्या अस्वलांसाठी ज्ञानगंगा अभयारण्य प्रसिद्ध आहे. सध्या या वणव्याने बुलडाणा, खामगाव व मोताळा या तीन तालुक्यांच्या सीमावर्ती भागातील पलढग, बोरखेड व उत्तर देव्हारी या तीन बिटमध्ये रौद्र रूप धारण केले आहे. अलीकडे ज्ञानगंगा अभयारण्यात लागलेली ही १५ वी आग आहे.आग आटोक्यात आणण्याच्या अपुºया साधनांमुळे ज्ञानगंगा अभयारण्याचे सातत्याने नुकसान होत असून, जंगलाची घनताही कमी झाली आहे. सातत्याने होत असलेली ही हानी रोखण्याकरिता नेमक्या उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. वन्यजीव विभागाकडे काही प्रमाणात अग्निरोधक साधने उपलब्ध असली तरी, त्यांचा परिणामकारक उपयोग केला जात नसल्याची माहीती आहे. दरवर्षी ज्ञानगंगा अभयारण्याला आगी लागण्याच्या घटनामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे.
पलढग बिटची मोठी हानी!पलढग बिटमध्ये प्रथमत: आग लागली होती. ती भडकत गेली व अन्य भागात पसरली. त्यामुळे पलढग बिटमधील वनसंपदेचे मोठे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. अग्निरक्षक व वन विभागाचे कर्मचारी ही आग विझविण्यासाठी प्रयत्नरत असले तरी मनुष्यबळाचा येथे मोठा अभाव असल्याचे चित्र आहे. या आगीत पलढग बिट जवळपास ५० टक्क्यांपेक्षा अधिक प्रमाणात नुकसानग्रस्त झाल्याचे बोलल्या जात आहे; मात्र त्यास अधिकृत स्तरावर दुजोरा मिळू शकला नाही. याबाबत अधिक जाणून घेण्यासाठी वन्यजीवचे बुलडाणा रेंजचे आरएफओ मयूर सुरवशे व खामगाव रेंजचे आरएफओ यांच्याशी संपर्क साधला असता, तो होऊ शकले नाही. अकोला येथील वन्यजीवचे डीएफओ मनोजकुमार खैरनार यांच्याशीही संपर्क साधला असता, त्यांचा भ्रमणध्वनी बंद होता.