मोताळा :तालुक्यातील निमखेड येथे शॉटसर्किटमुळे राेहित्राला आग लागली. आगीने थोड्याच वेळेत रौद्ररुप धारण केले. यावेळी निमखेड येथील अशोक उखा राठोड व त्यांच्या मित्रांनी समयसूचकता दाखवित २ तासाने आग आटोक्यात आणली. त्यामुळे आजूबाजुच्या शेतकऱ्यांच्या शेतातील लाखो रुपयांच्या गहू, हरभरा, कापूस पिकांची हानी टळली.
निमखेड येथील गट क्र.२२ शिवारातील राेहित्राला २८ फेब्रुवारी रोजी शॉटसर्किट झाल्यामुळे दुपारी आग लागली. आगीने थोड्याच वेळात रौद्ररुप धारण केले. आग वाढत असताना येथील गृहरक्षक अशोक उखा राठोड, लव राठोड, सावन जाधव, सरीचंद्र राठोड, सावन टाकडा यांनी समय सुचकता दाखवीत २ तासांनी आग आटोक्यात आणली. आग जर वाढतच गेली असती तर आजूबाजूच्या शेतातील शेतकऱ्यांच्या गहू, हरबरा, कापूस पिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असते. अशा घटना भविष्यात घडू नये, यासाठी महावितरणच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.