बुलडाणा : वनविभागाच्या लाकूड आगार परिसरात अचानक आग लागल्याची घटना २५ एप्रिल रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या दरम्यान घडली. या आगीत पालापाचोळा जळून खाक झाला असून सागवानची झाडे होरपळली. वनविभागाचे कर्मचारी, नागरिक व अग्निशामक विभागाने वेळीच आग आटोक्यात आणल्यामुळे मोठा अनर्थ टळला. बुलडाणा - खामगाव मार्गावर वनविभागाचे लाकूड आगार आहे. जप्त केलेला लाकूडसाठा व वाहने येथे ठेवलेली आहेत. या परिसरात वनविभागाच्या कर्मचाऱ्यांची निवासस्थाने आहेत. तसेच सागवानची २५ ते ३० झाडे आहेत. बुधवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास या परिसरात अचानक आग लागली. डोंगराकडील बाजूने लागलेली आग हळूहळू वरील बाजूला पसरली. या आगीत पालापाचोळा जळून खाक झाला तर सागवानची झाडे होरपळली. आगीची माहिती मिळताच लाकूड आगाराचे वनरक्षक राम वायाळ, वनसेवक दिलीप गवई, शेषराव रायकर, सुभाष आखरे, कमलकार चव्हाण, जीवन कांबळे, संदीप मडावी यांनी धाव घेत आग विझविण्यास सुरवात केली. तसेच नगरपालिकेच्या अग्निशमन विभागाचे वाहन घटनास्थळी दाखल झाले व कर्मचाऱ्यांनी तत्काळ ही आग आटोक्यात आणली. त्यामुळे लाकूडसाठ्यापर्यंत आगीची झळ पोहोचली नाही. नसता मोठे नुकसान झाले असते.
मदतीला धावली तरुणाई
लाकूड आगार नजीक बुधवारी दुपारी अचानक आग लागली. आगीचे लोळ बघून परिसरातील तरुणाई आग विझविण्यासाठी धावली. आपल्याला जमेल त्या पद्धतीने तरुणांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. कुणी पाण्याचे हंडे घेऊन धावले, कुणी हाती झाडाच्या फांद्या घेऊन आग विझविण्यास सुरुवात केली. त्यामुळे ही आग लवकर आटोक्यात येण्यास मदत झाली. कर्मचाºयांच्या निवासस्थानापर्यंत आगीची झळ पोहचू नये यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करीत होता.