चिखली, दि. १८- येथील एमआयडीसीस्थित गुरू गणेश जिनिंग अँण्ड प्रेसिंग फॅक्टरीत शॉर्ट सर्किटमुळे आग लागून सुमारे साडेसहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना १८ फेब्रुवारी रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली. प्रसंगावधान राखून जिनिंगची स्वत:ची सुसज्ज अग्निशमन यंत्रणा तसेच पालिकेच्या अग्निशमन दलाने या आगीवर वेळीच नियंत्रण मिळविल्याने पुढील अनर्थ टळला.येथील एमआयडीसी परिसरात राहुल इंदरचंद जैन यांच्या मालकीची गुरू गणेश जिनिंग अँण्ड प्रेसिंग फॅक्टरी आहे. या फॅक्टरीत नेहमीप्रमाणे कापसाची गाळप सुरू असताना दुपारी अडीच वाजेच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे अचानकपणे आग लागली. या फॅक्टरीत सर्वत्र रूई असल्याने काही क्षणातच या आगीने रौद्ररूप धारण केले. मात्र, आगीच्या अशा घटनांपासून संरक्षण व्हावे, यासाठी जिनिंग चालकांनी सर्वत्र सुसज्ज अग्निशमन यंत्रणा उभारलेली असल्याने जिनिंग व फॅक्टरीतील कर्मचार्यांनी या अग्निशमन यंत्रणेद्वारे आगीवर पाण्याचा मारा सुरू केला. तसेच या आगीची माहिती नगर पालिकेच्या अग्निशामक दलाला देण्यात आली. त्यामुळे पालिकेच्या अग्निशामक दलानेही तातडीने घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळविले. मात्र, या घटनेत जिनिंग व प्रेसिंग फॅक्टरीमधील कापूस तसेच कन्व्हर्ट बेल्ट सिस्टीम जळाल्याने सुमारे साडेसहा लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. आगीवर वेळीच नियंत्रण मिळविल्याने मोठे नुकसानही टळले आहे.
जिनिंग फॅक्टरीत आग
By admin | Published: February 19, 2017 2:11 AM