शेतकरी एकनाथ परसराम चव्हाण यांची गट.नं. ६० धाड शिवार याठिकाणी शेती आहे. यामध्ये त्यांनी रोडलगत शेतात उसाची लावण केली आहे. ऊस सध्या तोडणीकरिता तयार हाेता. या शेतात एका बाजूला विद्युत राेहित्र आहे आणि या ठिकाणी उच्च दाबाची विद्युत तारा आलेल्या आहेत. अचानक तारांच्या घर्षणामुळे खाली उसाच्या पिकास आग लागली. बाजूला असलेल्या पेट्रोलियमचे संचालक उमेश दांडगे, कर्मचारी सतीष जाधव, रामसिंग जाधव यांना ही बाब लक्षात आली आणि त्यांनी लगेचच आग विरोधक यंत्रणेच्या माध्यमातून उसाच्या पिकाला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवले. या संदर्भात वीज वितरण कंपनीचे डी. आर. शेळके, प्रवीण गुळवे यांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन विद्युत पुरवठा बंद केला. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. महसूल विभागाच्या वतीने कोतवाल बापू तोटे यांनी घटनेचा पंचनामा केला. या घटनेत संबंधित शेतकऱ्याचे जवळपास ४० टन उत्पादन जळाल्याने ८० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यास मदत देण्याची मागणी हाेत आहे.
शेतातील उभ्या उसाला आग, ८० हजार रुपयांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 4:31 AM