मंगरूळपीर (वाशिम) : तालुक्यातील आसेगाव पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या ग्राम हिवरा खु. येथे २२ मे रोजी दुपारच्या सुमारास शेतातील गोठ्याला अचानक आग लागली. त्यात दोन बैल जखमी झाले असून ७० हजारांच्या आसपास रकमेचे शेतीपयोगी साहित्य जळून खाक झाले. याबाबत प्राप्त माहितीनुसार, हिवरा खु. येथील अशोक कनडाजी खुडे या शेतकऱ्यांच्या शेतातील गोठ्याला २२ मे रोजी दुपारी दीड वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. या घटनेत गोठ्यामध्ये ठेवलेले शेतीपयोगी साहित्य जळून खाक झाले. यासह दोन बैल जखमी झाले असून त्यातील एकाची प्रकृती धोक्यात आहे. आगीचे वृत्त कळताच गावकऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळविण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. त्यामुळे पुढचे नुकसान टळू शकले. आगीचे नेमके कारण कळू शकले नाही. मंडळ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून शेतकरी खुडे यांच्या या घटनेत किमान ७० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल वरिष्ठांकडे सादर केला आहे.
गोठ्याला आग; ७० हजाराचे नुकसान!
By admin | Published: May 22, 2017 8:30 PM