बुलडाणा, दि. २४- जिल्ह्यात नगर परिषद निवडणुकीकरिता अर्ज भरण्याला २४ ऑक्टोबर रोजी सुरुवात झाली असून, पहिल्या दिवशी नगराध्यक्ष व नगरसेवक पदाकरिता एकही अर्ज प्राप्त झाला नाही. जिल्ह्यात नऊ नगरपालिकांच्या निवडणुका घोषित करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये दे.राजा, मेहकर, मलकापूर, बुलडाणा, चिखली, खामगाव, जळगाव जामोद, शेगाव व नांदुरा नगर परिषदांचा समावेश आहे. या नगरपालिकांसाठी अर्ज भरण्याचा सोमवार हा पहिला दिवस होता; मात्र पहिल्या दिवशी नगराध्यक्ष व नगरसेवकांकरिता एकही अर्ज आला नाही. मेहकर: नगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवशी सोमवार, २४ ऑक्टोबर रोजी एकही अर्ज प्राप्त झाला नाही. उपविभागीय अधिकारी डॉ. नीलेश अपार हे निवडणूक निर्णय अधिकारी तर मुख्याधिकारी सातपुते हे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी आहेत. २४ ऑक्टोबरपासून नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे; मात्र आज पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल झाला नव्हता. मेहकर नगरपालिकेची रणधुमाळी सुरू झाली असून, नगरपालिकेवर भाजपाचा झेंडा फडकविण्यासाठी भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत. शहरामध्ये प्रत्येक वार्डात बैठका सुरू असून, भाजपाने नगरपालिकेची निवडणूक स्वतंत्रपणे लढविण्याची तयारी केली आहे. नगरपालिकेच्या २४ नगरसेवकांसाठी भाजपाकडे आतापर्यंत ६0 इच्छुक उमेदवारांचे अर्ज आले असून, नगराध्यक्ष पदासाठी नऊ इच्छुक उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले, तर यावेळेस नगरपालिकेवर भाजपाचा झेंडा फडकविणारच, असा ठाम विश्वास प्रल्हाद अण्णा लष्कर यांनी व्यक्त केला आहे. यावेळी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मीकांत मोहरील, भाजप नेते डॉ.सुभाष लोहिया, संजय लोहिया, डॉ.देवीदास माल, डॉ.भगवान झंवर, डॉ.आशिष अवस्थी, माधव बाजड, महिला नेत्या अर्चना पांडे, मंदाकिनी कंकाळ, भाजयुमोचे जिल्हा पदाधिकारी चंदन सहगल, किरण जोशी, राजेश निकमसह पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.
पहिला दिवस कोराच!
By admin | Published: October 25, 2016 3:00 AM