बुलडाणा : पहिल्याच पावसात पैनगंगा नदीवरील पळसखेड नागोनजीकचा पर्यायी पूल सोमवारी पहाटे सहा ते सात वाजेच्या दरम्यान वाहून गेला. त्यामुळे बुलडाणा- अजिंठा मार्गावरील वाहतूक पूणपणे ठप्प झाली होती. गेल्या दोन वर्षांपासून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत बुलडाणा - अजिंठा या ५० किलोमिटर मार्गाचे काम सुरु आहे. मात्र महामार्गाचे काम अत्यंत संथगतीने होत असल्याने या मार्गावरुन ये- जा करणाºया हजारो वाहनधारकांना जीव मुठीत धरुन प्रवास करावा लागत आहे. दतपूर ते अजिंठा दरम्यान संपूर्ण मार्ग खोदलेला आहे. पावसामुळे सर्वत्र चिखल निर्माण झाल्याने वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. रविवारी रात्रीपासून जोरदार पावसाचे आगमन झाले. बुलडाणा तालुक्यातील सर्व नदीनाले दुथडे भरुन वाहू लागले. बुलडाणापासून १२ किलोमिटर अंतरावरील पळसखेड नागोजवळून पैनगंगा नदी वाहते. या मार्गाचे काम सुरु असल्याने नदीवरील जूना पूल तोडण्यात आलेला आहे. तर त्याठिकाणी नवीन पुलाचे काम सुरु आहे. वाहतूक सुरळित राहावी याकरिता बाजूने वळण रस्ता तयार करुन नदीवर पर्यायी पुलाचे बांधकाम करण्यात आले. मात्र पाणी वाहून जाण्यासाठी केवळ दोनच पाईप टाकण्यात आले. परंतू याठिकाणी पैनगंगा नदीचा प्रवाह जोरात असतो. असे असतांनासुध्दा ठेकेदाराने हलगर्जी केली. याचाच परिणाम रात्री पडलेल्या जोरदार पावसामुळे हा पर्यायी पूल वाहून गेला. यामुळे वृत्त लिहेपर्यंत बुलडाणा - अजिंठा मार्गावरील वाहतूक बंद आहे.
एनएचएच्या निर्देशाकडे ठेकेदाराचे दुर्लक्षबुलडाणा- अजिंठा मार्गावरील पर्यायी पूलाचे बांधकाम करताना अधिक संख्येत पाईप टाकण्याचे निर्देश राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने ठेकेदाराला दिले होते. परंतू ठेकदाराने याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे पहिल्याच पावसात हा पूल वाहून गेला. सुदैवाने कुठलीच अनुचित घटना घडली नाही. वरिष्ठ अधिकाºयांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
दोन वर्षापूर्वी दोन जण गेले होते वाहून मागील दोन वर्षापूर्वी याच ठिकाणावरुन बुलडाणा येथील इंदिरा नगर भागातील दोन जण वाहून गेले होते. पैनगंगा नदीच्या पाण्याचा प्रवाह येथे वेगात असतो. सोमवारी पूल वाहून गेला तेंव्हा कुठलेच वाहन पुलावरुन जात नव्हते. अन्यथा मोठी दुघर्टना घडली असती. आता नवीन पर्यायी पूल बांधतांना नदीचा प्रवाह लक्षात घेण्याची गरज आहे.
संपूर्ण मार्ग चिखलमय बुलडाणा- अजिंठा मार्गाचे कंत्राट सुनील हायटेक या कंपनीला मिळाला होता. सदर कंपनीला आॅक्टोंबर २०१७ मध्ये वर्कआॅर्डर देऊन २४ महिन्यात काम पूर्ण करण्याचे निर्देश होते. परंतू या कंपनीने अगोदरचे आठ महिने केवळ पाच ते दहा टक्के काम केले. आपल्याकडे काम होणार नाही म्हणून दुसºया दोन कंपन्यांना काम वाटून देण्यात आले. सध्या दत्तपूर ते अजिंठ्यापर्यंत जवळपास ४० किलोमिटरचा मार्ग खोदलेला आहे. त्यावर मुरुम, माती टाकलेली असल्याने जोरदार पाऊस पडल्याने मार्गावर चिखल साचला. परिणामी वाहनधारकांना अपघातांचा सामना करावा लागत आहे. पावसाळ्याचे दिवस आणि हा चिखलमय मार्ग यातून केंव्हा सुटका मिळते, असा प्रश्न नागरिकांच्या मनात उपस्थित होत आहे.