बुलडाणा : भारतीय वन्यजीव संस्थेचे डॉ. बिलाल हबीब आणि महाराष्ट्र वनविभागाच्या अर्थसहाय्यातून ‘लॉगटर्म मॉनिटरिंग ऑफ टायगरर्स’ या उपक्रमातंर्गत ज्ञानगंगा अभयारण्यात प्राण्यांची ट्रॅप कॅमेऱ्याद्वारे प्रथमच गणना करण्यात येणार आहे. चार मार्चपासून प्रत्यक्षात या गणनेस प्रारंभ होईल, असे सूत्रांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले. प्रामुख्याने बिबट व वाघ यांच्या शरीरावरील खुणांवरून विशिष्ट क्षेत्रात किती बिबटे व वाघ आहेत हे छायाचित्रांच्या सहाय्याने या गणनेतून स्पष्ट होईल. यासोबतच संबंधित पाण्यांची या माध्यमातून एक ओळखही वन्यजीव विभागाकडे (आयडी) निर्माण होण्यास मदत होईल. ३ मार्च जागतिक वन्यजीव दिन आहे. त्यानुषंगाने माहिती घेतली असता ही बाब समोर आली आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्प हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रकल्प आहे. त्यातंर्गत ज्ञानगंगा अभयारण्याचा समावेश आहे. त्यात यावर्षीप्रथमच अशा पद्धतीने प्राणिगणना होणार आहे. जवळपास २५ दिवस ज्ञानगंगा अभयारण्यात या पद्धतीने बिबट व वाघाचे छायाचित्र घेण्यात येऊन शरीरावरील खुणांवरून त्यांची आयडी तयार केली जाईल. या गणननेतून ज्ञानगंगा अभयारण्यातील तृणभक्षी प्राणी, वाघ, बिबट यांची अचूक माहिती काढण्यास मदत मिळणार आहे. त्यामुळे ही गणना महत्त्वाची आहे. सोबतच अभयारण्यातील कोणत्या भागत वाघ, बिबट्यांचा वावर आहे. तेथील तृणभक्षी प्राणी किती हे ही स्पष्ट होण्यास मदत होईल. अभयारण्याची अत्यंत महत्त्वाचीही माहिती यामध्ये मिळणार आहे.
--अभयारण्यात लागणार १७० कॅमेरे--
ज्ञानगंगा अभयारण्यात त्यादृष्टीने १७० ट्रॅप कॅमेरे लावण्यात येत असून प्रती दोन चौरस कि.मी.वर एक याप्रमाणे कॅमेरे लावण्यात येतील. या पद्धतीचे सर्वेक्षण तथा गणना ही किचकट प्रक्रिया आहे. त्यामुळे जवळपास २५ दिवस यापद्धतीने येथे माहिती संकलित केली जाणार आहे.
--ट्रॅन्जेक्ट सर्वे--
अभयारण्यातील तृणभक्षी प्राण्यांचाही सहा दिवस ट्रॅन्जेक्ट सर्वे करण्यात येणार आहे. चार मार्च पासून त्यासही प्रारंभ होईल. यामध्ये प्रत्यक्ष जंगलामध्ये दोन किमीच्या रेषेत पाहणी करून दिसून आलेले प्राणी व तत्सम माहिती संकलित करून तृणभक्षी प्राण्यांची गणना यात करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. मेळघाट टायगर फाऊंडेशन अंतर्गत हे काम होत आहे.