लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : आषाढी एकादशी यात्रेसाठी खामगाव येथून सुरू करण्यात आलेल्या विशेष विठ्ठल दर्शनमुळे खामगाव रेल्वे स्थानकाला तब्बल ४ लाख ८१ हजार ७३५ रुपयांचे उत्पन्न मिळाले. आषाढी एकादशीसाठी खामगाव येथून सुरू करण्यात आलेल्या आषाढी विशेष विठ्ठल दर्शन एक्सप्रेसचा लाभ ३२४८ भाविकांनी घेतला.महाराष्ट्राचे आराध्य दैवत पंढरपूरच्या पांडूरंगाच्या आषाढी एकादशी एकादशीची आस भाविकांना लागलेली असते. या भाविकांसाठी यावर्षी येथून २८ जून रोजी दुपारी ४ वाजता १२ बोगींची पहिली फेरी रवाना झाली. पहिल्या फेरीने ४६७ भाविकांनी पंढरीची वाट धरली. यापासून येथील रेल्वे स्थानकावर ४०२ तिकीटांची विक्री झाले. या एक्सप्रेसचे खामगाव ते पंढरपूरपर्यंत प्रवास भाडे १९५ रुपये , ज्येष्ठ महिलेसाठी १०० रुपये, ज्येष्ठ पुरुष १२० रुपये तर बालकांसाठी रुपये असे यापासून येथील रेल्वे स्थानकाला ४४ हजार ११५ रुपयांचे उत्पन्न मिळाले. त्यानंतर २९ जून रोजी दुसरी फेरी, १ जुलै रोजी तिसरी फेरी आणि २ जुलै रोजी चौथी फेरी रवाना झाली. या चारही फेऱ्यांमध्ये ३२ ४८ भाविकांनी पंढरीची वाट धरली. या फेऱ्यांच्या माध्यमातून खामगाव रेल्वे स्थानकाला ४ लक्ष ८१ हजार ७३५ रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले.भाविकांसाठी रेल्वे आणि सामाजिक संघटनांकडून व्यवस्था!भाविकांना तिकीट घेताना गैरसोय होवू नये यासाठी अतिरिक्त खिडकी सुध्दा सकाळपासून सुरु करण्यात आली होती. तसेच विविध सामाजिक संघटनांसोबतच भाविकांना सुविधा पुरविण्यासाठी येथील रेल्वे स्टेशन प्रबंधक संजय भगत, मुख्य बुकींग पर्यवेक्षक यांच्यासोबतच उपस्टेशन प्रबंधक सुरेश गोळे, कुणालकुमार, बुकिंग लिपिक प्रशांत बनसोड, सोनाजी तेलगोटे, निरज मिलिंद, टी.आय. देशपांडे, सी.आय. निकम, इंद्रपाल म्हैसकर, व्ही.आर.वानखडे, इंदिराबाई ठाकूर, संजीवनी इंगळे, उमाबाई व इतरांनी परिश्रम घेतले.श्री विठ्ठल दर्शन एक्सप्रेसला खामगाव परिसरातील भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. भाविकांच्या सोयीसाठी विशेष टिकीट सुविधेसोबतच इतरही सुविधा भाविकांना देण्यात आल्या.- संजय भगत, स्टेशन प्रबंधक, खामगाव.