मलकापूर : तालुक्यातील पाच महसुली मंडळात शुक्रवारी सकाळी सरासरी ५९ मी.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. या पावसामुळे कोरडवाहू पिकांना संजीवनी मिळाली आहे. यामुळे शेतकऱ्यांना व प्रचंड उकाड्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मलकापूर तालुक्यात दमदार पावसाची अपेक्षा व्यक्त केली जात होती. जुलै महिन्यात १९ व २० सप्टेंबर रोजी अतिवृष्टी झाली होती. त्यानंतर पावसाने जणुकाही दडीच मारल्याने पिकांच्या प्रामुख्याने कोरडवाहू पिकांच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता निर्माण झाली होती.
तालुक्यात बागायती पिकांची परिस्थिती चांगली होती. पण कोरडवाहू पिकांना पावसाची नितांत गरज होती. त्यातल्या त्यात वातावरणात प्रचंड उकाडा वाढल्याने लोकांच्या अडचणी वाढल्या होत्या. असे असतानाच गुरुवारी रात्री व शुक्रवारी सकाळी अशा १२ तासात चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांसह नागरिक सुखावले आहेत. शुक्रवारी सकाळी मलकापूर तालुक्यातील पाच महसुली मंडळात ५९ मी.मी.पावसाची नोंद झाली आहे. त्यात मलकापूर महसुली मंडळात ७२.३ मी.मी., दाताळा ५३.८ मी.मी., नरवेल ४३.८ मी.मी. धरणगाव ७२.३ मी.मी. तर जांबुळधाबा महसुली मंडळात ५७ मी. मी. पावसाची नोंद झाली आहे.त्यामुळे मलकापूर तालुक्यातील पूर्व व उत्तर क्षेत्रातील पिकांना लाभ झाला आहे. नाल्याला पूर, चार बसफेऱ्या रद्दतालुक्यात गत १२ तास चांगला पाऊस झाला. त्यामुळे मलकापूर - देवधाबा रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. या रस्त्यावर हिंगणा काझी येथील नाल्याच्या पुलावरुन पाणी वाहत असल्याने या भागातील चार बसफेऱ्या रद्द करण्यात आल्याची माहिती परिवहन महामंडळाचे आगारप्रमुख मुकूंद न्हावकर यांनी दिली आहे. या रस्त्यावरील शालेय बसफेऱ्या आधीच बंद होत्या. मात्र, प्रवासी बसफेऱ्या रद्द झाल्यानंतर अनेकांना त्याचा फटका बसला आहे.