लोकमत न्यूज नेटवर्कलोणार : राज्यात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत अनु.जाती व मागासवर्गीय मुलांमुलींसाठी एकूण ८४ शाळा कार्यरत आहेत. उत्तम दर्जाचे शिक्षण, मोफत निवास, निसर्गरम्य असा शालेय परिसर, सुसज्ज ग्रंथालय, प्रयोगशाळा, अनुभवी व तज्ञ शिक्षक मार्गदर्शन, पालक व समाज उद्बोधन, विविध सामाजिक व शालेय असे नाविन्यपूर्ण उपक्रम, शैक्षणिक सहली, मर्यादित प्रवेश संख्या आणि वार्षिक स्नेहसंमेलने आदी बाबींमुळे जिल्ह्यातील पाच ही शाळांनी आय.एस.ओ. मानांकन प्राप्त केले आहे.पूर्वी समाजकल्याण आणि आश्रमशाळा यांचेकडे बघण्याचा समाजाचा दृष्टीकोन वेगळा होता. पण आज हा दृष्टिकोन पुसत विभागाच्या शाळा यशाचे शिखर सर करू पाहत आहेत. त्याचेच एक आदर्श उदाहरण म्हणजे विदर्भाचे प्रवेशद्वार असणाºया बुलडाणा जिल्ह्यातील लोणार, शेगाव, खामगाव, वळती (चिखली), कोलवड (बुलडाणा) येथे असलेल्या प्रत्येकी २०० विद्यार्थी क्षमता असलेल्या आश्रम शाळांनी आय.एस.ओ. मानांकन प्राप्त केले आहे. आज या शाळा शिक्षण क्षेत्रात नावलौकिक प्राप्त करीत आहेत. सद्यस्थितीला या शाळांच्या भौतिक सुविधा आणि गुणवत्ता ह्या वाखाणण्याजोग्या आहेत. सदर शाळांचे विद्यार्थी हे शालेय व शाळाबाहय उपक्रमांमध्ये सहभागी होऊन जिल्ह्याचेच नव्हे तर संपूर्ण राज्य आणि सामाजिक न्याय विभागाचे नावलौकिक करीत आहेत. याचे सर्व श्रेय हे जिद्द, चिकाटी व मेहनतीने शाळेत अहोरात्र काम करत असलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गाला तसेच कुशल सेनापतीप्रमाणे आपली सेना उत्कृष्टरित्या सत्कर्मी लावणारे सर्व मुख्याध्यापक आणि तुटपुंज्या पगारावर काम करणारे तासिका शिक्षक व क्रिस्टल कर्मचारी यांना जाते.
भविष्यात जिल्ह्यातील विभागाचे सर्व वसतिगृहे सुद्धा आय.एस.ओ. करण्याचा मानस आहे. याचीच प्रचिती म्हणून आज जिल्ह्यातील पाचही शाळा आय.एस.ओ. मानांकन प्राप्त झाल्यात. तसेच विभागाचे आयुक्त मिलिंद शंभरकर आणि अनुराधा ओक, उपसंचालक शिक्षण आयुक्त कार्यालय पुणे यांनी गेल्या काही दिवसांपासून शाळा भौतिक सुविधा आणि गुणवत्ता वाढीसाठी विडा उचललेला आहे.- प्र.घ.गिरी, मुख्याध्यापक, अनु.जाती मुलांची शासकीय निवासी शाळा, लोणार .