लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: शहरातील वृक्ष लागवड मोहिमेस गती देण्यासाठी, ट्रि गार्ड, वृक्ष पुरवठा, वृक्षारोपण आणि संगोपनाच्या कामांसाठी आलेल्या अंदाजपत्रकाला प्रशासकीय मान्यता देण्यासोबतच इतर चार विषयांना पालिकेच्या खास सभेत बुधवारी मान्यता देण्यात आली. पाच विषयांना मंजुरी देण्यासाठी आयोजित सभा ही अवघ्या पाचच मिनिटांत पार पडली.या सभेला नगराध्यक्ष तथा पीठासीन अधिकारी अनिता डवरे, मुख्याधिकारी धनंजय बोरीकर, उपाध्यक्ष संजय मुन्ना पुरवार यांच्यासह सत्ताधारी आणि विरोधी नगरसेवकांची उपस्थिती होती. तथापि, सभेला सुरुवात झाल्यानंतर राष्ट्रगीत घेण्यात आले. त्यानंतर विरोधी पक्षाकडून टिप्पणी मिळाली नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. मुख्याधिकारी धनंजय बोरीकर यांनी टिप्पणीबाबत प्रशासनाच्यावतीने दिलगिरी व्यक्त केली; मात्र विरोधी नगरसेवकांनी या बाबीचा निषेध नोंदवित सभात्याग केला. त्यानंतर पालिका इमारतीच्या प्रवेशद्वारावर तीव्र घोषणाबाजीही केली. दरम्यान, वृक्षारोपण आणि संगोपनाच्या कामांसोबतच नगरोत्थान योजनेंतर्गत कामे प्रस्तावित करण्याकरिता विचार विनिमय करून निर्णय घेणे, शिकाऊ उमेदवारांची नियुक्ती करणेबाबत, वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत सन २०१७-१८ कामे प्रस्तावित करण्याकरिता विचार विनिमय करून निर्णय घेणे, सन २०१७-१८ करिता मुरूम पुरवठा करण्याच्या निविदेला मान्यता देण्याच्या विषयांना बहुमताने मंजुरी देण्यात आली. विरोधकांचा सभात्याग- स्थानिक नगरपालिकेची खास सभा बुधवारी आयोजित करण्यात आली. या सभेची टिप्पणी न मिळाल्याने, विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी सभेवर बहिष्कार टाकला. यावेळी सभागृहाबाहेर विरोधी नगरसेवकांनी तीव्र घोषणाबाजीही केली.- शहरातील विविध विकास कामांना मान्यता देण्यासाठी खामगाव नगरपालिकेची खास सभा बुधवारी दुपारी ४ वाजता आयोजित करण्यात आली. या सभेच्या विषय सूचीचे १ जुलै रोजी वितरण करण्यात आले. मात्र, सभेच्या वेळेपर्यंतही विरोधी नगरसेवकांना टिप्पणी देण्यात आली नाही. त्यामुळे विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी सभेच्या कामकाजावर बहिष्कार टाकत, सभेतून बहिर्गमन केले. यावेळी विरोधी पक्ष नेत्या अर्चना टाले, नगरसेवक अमय सानंदा, अलकादेवी सानंदा, प्रवीण कदम, सरस्वती खासणे, मो. इब्राहिम, शीतल माळवंदे, नगरसेविका पाटील यांच्यासह काँग्रेसच्या नगरसेवकांचा समावेश होता.पालिकेच्या प्रत्येक सभेत संख्याबळाच्या जोरावर सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांची कोंडी केली जाते. कायद्याचे पुस्तक बाजूला ठेवत, पालिकेचे कामकाज सुरू आहे. विरोधकांपासून काही गोष्टी लपवून ठेवण्यात येत आहेत. -अमय सानंदा, नगरसेवक, काँग्रेसपालिकेच्या खास सभेची टिप्पणी अनावधानाने दिली गेली नाही. याबाबत दिलगिरी व्यक्त करून यापुढील प्रत्येक सभेची टिप्पणी देण्याचे आपण सभागृहात सांगितले, तरीदेखील विरोधी सदस्यांनी सभात्याग केला. सभात्यागाऐवजी त्यांनी सभेत बसायला हवे होते.- धनंजय बोरीकर, मुख्याधिकारी, खामगाव.
पाच मिनिटांत पाच विषय मंजूर!
By admin | Published: July 06, 2017 12:14 AM