लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : शहरासह जिल्ह्यात महिन्याकाठी चार ते पाच हजारावर सीटी स्कॅन केले जात आहेत. मात्र, शासकीय दराऐवजी मनमानी पध्दतीने सीट स्कॅनसाठी दराची आकारणी केली जात असल्याचे वास्तव समोर येत आहेे. राज्य सरकारने कोरोना रुग्णांसाठी खासगी केंद्रामध्ये सीटी स्कॅनचा दर निश्चित केला आहे. २ हजार ५०० रुपयांपेक्षा जास्त दर आकारू नये, असे निर्देशही दिले आहेत. असे असताना, काही खासगी केंद्र ३५०० ते ४५०० रुपये शुल्क वसूल करीत असल्याच्या तक्रारी आहेत. खासगी केंद्रातील कोरोना रूग्णांना सीटी स्कॅन आणि इतर तपासण्यांसाठी दामदुपटीने दर मोजावे लागत आहे. बुलडाणा शहरात रेमडेसिवीर इंजेक्शनचाही तुटवडा निर्माण झाला असून, खासगी रूग्णालयाशी संलग्न असलेले औषध दुकानदार रूग्णालयात भरती असलेल्या रूग्णांच्या नातेवाईकांकडून अव्वाच्या सव्वा दराने पैसे उकळत आहेत. मात्र, याकडे शासकीय यंत्रणेचे अक्षरक्षा दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसून येत आहेे.
दुपटीने वाढले सीटी स्कॅन एचआरसीटीकोरोना विषाणु संसर्गाचा उद्रेक वाढत असतानाच कोरोनाबाधित रूग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना अतिरीक्त शुल्क मोजावे लागत आहे. सीटीस्कॅन तसेच विविध तपासण्यांसाठी दूपटीने शुल्क आकारल्या जात आहे. त्यामुळे कोरोना बाधित रूग्ण आणि त्यांचे नातेवाईक गत काही दिवसांपासून मेटाकुटीस आले आहेत.
कोरोना कालावधीत सेवा देण्यासाठी शहरातील खासगी डाॅक्टर प्रयत्नरत आहेत. रूग्णांना सुविधा देण्यासाठी खासगी डाॅक्टरांची धडपड सुरू आहे. सेवेलाच खासगी डाॅक्टर आणि रक्तपेढी तसेच सीटी स्कॅनचीही सेवा दिली जात आहे. दरम्यान, शासकीय दरानुसारच सर्व शुल्क आकारले जातात. मात्र, काही रूग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांकडून अतिरिक्त दर आकारल्या जात असल्याचे आरोप बिनबुडाचे आहेत.-डॉ. के.एम. टिकार,
कोरोना संसर्गाचा दुर्दवी सामना परिवारातील दोन सदस्यांना करावा लागत आहे. गत दहा दिवसांपासून दोन्ही रूग्ण एका खासगी रूग्णालयात भरती आहे. या रूग्णालयातून उपचारासाठी लागणारे इंजेक्शन आणि इतर सुविधांसाठी अव्वाच्या सव्वा दर आकारले जात आहेत. नाइलाजाने रूग्ण वाचविण्यासाठी धडपड करावी लागत आहे. - कैलास पवार, नातेवाईक, धाड.