पोलीस व पालिकेच्या पथकाने सध्या शहरात संयुक्तपणे कारवाई सुरू केली आहे. दरम्यान, आगामी काळातही ही कारवाई सुरूच राहणार असल्याचे पालिकेच्या सूत्रांनी सांगितले.
प्रतिबंधीत क्षेत्रांमध्ये जीवनावश्यक वस्तूंची प्रतिष्ठाने सकाळी नऊ ते दुपारी तीन वाजेपर्यंतच सुरू ठेवण्याचे निर्देशित केलेले असतानाच काही व्यापारी त्यांची दुकाने सुरू ठेवत असून, काहीजण अर्धवट दुकाने उघडी ठेवत आहे. हा प्रकार पालिका प्रशासनाने गंभीरतेने घेत कारवाई सुरू केली आहे. शहरात पालिकेची जवळपास तीन पथके सध्या कार्यरत आहेत. पोलिसांचीही या पथकांना मदत होत आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची पायमल्ली करणाऱ्या पार्वती ट्रेडर्स, महावीर आयस्क्रीम पार्लर, चंद्रकला झेरॉक्स, राजमुद्रा ऑनलाईन सेवा केंद्र, श्याम मशनरी या व्यापारी प्रतिष्ठांना प्रत्येकी पाच हजार रुपये दंड आकारण्यात आला आहे. याशिवाय विनामास्क फिरणाऱ्यांवरही दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.
गेल्या दोन दिवसांत जवळपास एक लाख रुपयांपेक्षा अधिक दंड प्रशासनाने केला आहे.
जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची पायमल्ली करणाऱ्यांना प्रथमत: पाच हजार रुपये, दुसऱ्यांदा पुन्हा आढळल्यास २५ हजार रुपये आणि तिसऱ्यांदा आढळून आल्यास थेट दुकान सील करण्यात येईल, असा इशारा पालिका मुख्याधिकारी महेश वाघमोडे यांनी दिला आहे.
दरम्यान, जिल्हाधिकारी यांनीही दोन दुकानांना दंड ठोठावला असून, जमावबंदी आदेश व प्रतिबंधित क्षेत्रासाठी घालून देण्यात आलेल्या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासोबतच नागरिकांनी त्याचे गंभीरतेने पालन करण्याचे स्पष्ट केले आहे.