खामगाव : नोकरीवर लावून देण्याचे आश्वासन देऊन दोन भामट्यांनी पाच सुशिक्षित बेरोजगारांकडून ७५ हजार रुपये घेऊन त्यांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत गजानन रामदास चिमनकार (वय २७) रा.कदमापूर याने शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली की, काही दिवसाअगोदर प्रकाश सोनाजी कळसकार रा. बोबडे कॉलनी व शैलेश उत्तम वानखडे रा.आसलगाव या दोघांनी येथील वामननगरमध्ये बनावट सुशिक्षित बेरोजगार मेळावा घेऊन खोटे कागदपत्र दाखवित युवकांना नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवले.तसेच आमचा विश्वास संपादन करून नोकरी लावून देण्यासाठी माझ्याकडून २० हजार रुपये तर श्याम वासुदेव दांडगे रा. आसलगाव याच्याकडून २० हजार रुपये, शे. मोहसीन शे. अयुब रा. जळगाव यांच्याकडून १२ हजार ५०० रुपये, अजय सुरेश राजपूत रा. जळगाव जामोद यांच्याकडून १० हजार रुपये तसेच शे. नाजीर शे. अयुब रा.बर्डे प्लॉट याच्याकडून १२ हजार ५०० रुपये घेतले. मात्र नोकरीवर न लावता पैसे घेऊन आमची फसवणूक केली. याप्रकरणी शहर पोलिसांनी उपरोक्त दोघांविरुद्ध कलम ४२०, ४६८, ४७१, ३४ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास एएसआय रामराव राठोड हे करीत आहेत.
रोजगार मेळाव्यातून पाच बेरोजगारांची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2018 6:54 PM