बुलडाणा/मलकापूर: कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. तर दुसरीकडे कोरोना बाधीत रुग्ण बरे होत असल्याचे दिलासादायक चित्रही समोर येत आहे. मलकापूर तालुक्यातील नरवेल येथील पाच वर्षाच्या चिमुकलीने कोरोनावर मात केली आहे. कोविड केअर सेंटरमधून २३ मे रोजी या मुलीला सुट्टी देण्यात आली. टाळ्या वाजवून सर्वांनी तिचे स्वागत केले.मलकापूर तालुक्यातील नरवेल येथील पाच वर्षीय मुलगी मुंबई येथून गावाकडे आल्यानंतर कोरोना पॉझिटिव्ह आढळली. ही मुलगी बुलडाणा येथे कोविड केअर सेंटरला दाखल होती. तिने आतापर्यंत कोरोनाशी चिवट झुंज दिली. अखेर या मुलीने कोरोनाला हरविल्याचा दिलासादायक प्रकार २३ मे रोजी समोर आला. त्यामुळे आता मलकापूर तालुक्यातून कोरोनाला हद्दपार करण्यात यश आले आहे. नरवलेच्या गुडीयाला केंद्र शासनाच्या नवीन निकषांनुसार कुठलेही कोरोनाचे लक्षणे आढळून न आल्यामुळे सुट्टी देण्यात आली. त्यानंतर घरी तिला विलगीकरणात ठेवण्यात येणार आहे.पुष्पगुच्छ देऊन चिमुकलीचे स्वागतनरवलेच्या या चिमुकलीला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडित यांच्या हस्ते डिस्चार्ज पेपर देण्यात आला. त्यांनी पुष्पगुच्छ देवून चिमुकलीचे स्वागत केले. यावेळी उपस्थित डॉक्टर्स, नर्सेस व ब्रदर्स यांनी गुडीयाचे टाळ्या वाजवून स्वागत केले. शासनाच्या रुग्णवाहिकेतून तिला घरी सोडण्यात आले.
मलकापूर तालुक्यातील नरवेलच्या पाच वर्षीय चिमुकलीची कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2020 10:45 AM