लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: तलावावरून पाणी देण्यास वरवंडच्या लोकांनी केलेला विरोध यामुळे पाच वर्षांपासून मंजूर झालेली डोंगरखंडाळा येथील महाजल पाणीपुरवठा योजना अद्यापही रखडलेलीच आहे. कायम पाणीटंचाईचा सामना करणार्या डोंगरखंडाळा गावात सध्या भीषण पाणी समस्या उद्भवलेली असून, शासनाने यासंदर्भात त्वरित हस्तक्षेप करून या योजनेचे काम सुरू करावे अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. डोंगरखंडाळा येथील तलावाचे पाणी पिण्यास योग्य नसल्याने तसेच गावात कायम असलेली पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई लक्षात घेऊन स्थानिक ग्रामपंचायतीने पाठपुरावा केल्याने महाराष्ट्र शासनाने २00९ मध्ये डोंगरखंडाळा येथे २ कोटी ८0 लाख रुपये खर्चाची महाजल पाणीपुरवठा योजना मंजूर केली. २0१२ ला महाजल योजनेच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात करण्यात आली. या योजनेंतर्गत डोंगरखंडाळा ते वरवंड तलावा पर्यंत ३ कि.मी. ची पाइपलाइन, तलावातील बुडीत क्षेत्रात दोन विहिरी खोदण्यासह फिल्टर प्लॅन्ट, पाण्याची टाकी या कामांचा समावेश आहे. दरम्यान, गावाला त्वरित पिण्याचे पाणी मिळावे म्हणून बुलडाणा अर्बन परिवाराने फिल्टर प्लॅन्ट व पाण्याची टाकी बांधण्यासाठी जागा दान दिली. दरम्यान, सदर योजनेचे काम सुरू झाले. वरवंड तलावापर्यंत पाइपलाइन टाकण्यात आली, फिल्टर प्लॅन्ट व पाण्याच्या टाकीचे बांधकाम सुरू झाले; मात्र त्यानंतर वरवंड ग्रामस्थांनी शेजारधर्माचे पालन न करता केवळ विरोधाची भूमिका घेऊन तलावावरून पाणी देण्यास नकार दिला. एवढय़ावरच न थांबता वरवंडच्या लोकांनी या योजनेत सातत्याने अडथळे आणले, ठिकठिकाणी पाइपलाइन फोडण्यात आली, तलावातील पडीत जमिनीवर ज्ॉकवेल व इनटेजवेल विहिरींच्या बांधकामालाही विरोध केला. या सर्व प्रकारामुळे २0१३ पासून ठेकेदाराने सदर योजनेचे काम अर्धवट सोडले. आजही ही सर्व कामे अर्धवट व रेंगाळलेल्या अवस्थेत असल्याने डोंगरखंडाळा येथील पाणी समस्या अत्यंत जिकिरीची झाली आहे.
वरवंड ग्रामस्थांनी अडवलेले पाणी यामुळेच डोंगरखंडाळा ये थील पाणीपुरवठा योजना रखडली आहे. सध्या गावात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. यावर्षी कमी पाऊस व कायम पाणीटंचाई असणार्या डोंगरखंडाळा येथे आजही टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाने मध्यस्थी करून या योजनेचे काम तत्काळ सुरू करावे.- मालती किशोर चांडकसरपंच, डोंगरखंडाळा.
वरवंडच्या नागरिकांनी तलावातील बुडीत क्षेत्रात ज्ॉकवेल व इंटेजवेलच्या विहिरी खोदण्यास विरोध केला, जागोजागी पाई पलाईन फोडली. यासंदर्भात जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद मु ख्य कार्यकारी अधिकार्यांना निवेदने दिली; मात्र काहीच निष्पन्न झाले नाही. जिल्हा प्रशासनाने या कामाला पोलीस संरक्षण द्यावे व तत्काळ काम सुरू करावे अन्यथा आंदोलन करण्याशिवाय पर्याय नाही. - साहेबराव छोटू चव्हाणअध्यक्ष, महाजल पाणीपुरवठा समिती