भारतात प्रामुख्याने रोहित या नावाने हा पक्षी ओळखला जातो. पाणथळ जागी तो थव्याने राहणार पक्षी आहे. उंच मान व लांब पाय असलेल्या रोहित पक्षाची पिसे गुलाबी किंवा फिकट गुलाबी रंगाची असतात. जगात आढळणाऱ्या त्याच्या चार प्रजातींपैकी दोन प्रजाती या आशिया खंडात आढळत असल्याची नोंद आहे. प्रामुख्याने स्थलांतरित पक्षी म्हणून फ्लेमिंगो अर्थात रोहित पक्षी अेाळखला जातो. गुजरात राज्यातील कच्छच्या रणमध्ये या पक्षाची व्याप्ती अधिक आहे. महाराष्ट्राचा विचार करता पुण्याजवळील उजनी धरणाच्या परिसरात या पक्षांसाठी आवश्यक असलेल्या उथळ जागा आहे. तेथे हिवाळ्यात तथा उन्हाळ्यात हे पक्षी थव्याने आढळतात.
त्यातच आता बुलडाणा जिल्ह्यातील पलढग धरणाच्या परिसरात सलग दुसऱ्या वर्षी फ्लेमिंगोंचा थवा आढळून आल्यामुळे पर्यावरणीय दृष्ट्या ही बाब सकारात्मक आहे. त्यातच पलढग सरोवराचा परिसर वनपर्यटनाच्या दृष्टीने विकसित करण्यात येत आहे. येथे नियमित स्वरूपात फ्लेमिंगो यावयास लागल्यास त्याचाही या पर्यटनाला फायदा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.