निराधारांना अनुदान देण्याची मागणी
किनगाव राजा : काेराेना संक्रमण राेखण्यासाठी शासनाने संचारबंदी लागू केली आहे. संचारबंदीच्या काळात निराधारांना १ हजार रुपये मदत देण्याची घाेषणा शासनाच्यावतीने करण्यात आली आहे. शासनाने निराधारांना तातडीने अनुदान देण्याची मागणी मनसेचे परिवहन सेनेचे तालुकाध्यक्ष महेंद्रकुमार पवार यांनी केली आहे.
टॅंकर मंजूर झाल्याने ग्रामस्थांना दिलासा
बुलडाणा : तालुक्यातील भादोला येथील पाणीटंचाईची तीव्रता लक्षात घेता, या गावाला पाणी पुरवठ्यासाठी एक टँकर मंजूर करण्यात आला आहे. येथील ४४,३३३ लोकसंख्येसाठी एक टँकर मंजूर करण्यात आला आहे. हा टँकर गावाला दररोज १ लाख ३ हजार ६६० लीटर पाण्याचा पुरवठा करणार आहे. टँकरने केलेल्या खेपांची ग्रामपंचायतीने नोंद ठेवावी, असे उपविभागीय अधिकारी यांनी कळवले आहे.
लसीकरण केंद्रावर उसळली गर्दी
बुलडाणा : येथील जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात कोरोना प्रतिबंधात्मक लस घेण्यासाठी शहरातील नागरिकांनी तोबा गर्दी केली होती. याचा ताण येथील आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांवर दिसून येत आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात शहरासह परिसरातून विविध आजारांवर उपचार घेण्यासाठी नागरिक येत असतात. त्यातच काेराेना लसीकरणाचा भार वाढला आहे.
उन्हाळ्यात पाणी वाचविण्याची गरज
देऊळगाव मही : बऱ्याच ठिकाणी नळाला तोट्या नसल्यामुळे पाण्याचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय होतो. तर वाहने धुण्यासाठीही जास्त पाणी वापरले जात असल्याचे वास्तव आहे. मात्र, या दोन्ही बाबींकडे नागरिकांचे दुर्लक्ष झाले आहे.
रस्ताकामाला मिळेना गती
किनगाव राजा : परिसरातील अनेक रस्त्यांच्या कामाला गती मिळत नसल्याने ग्रामस्थांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. उमरद शिवारातही अनेक रस्त्यांचे काम रखडले आहे. गावादरम्यान थोडेसे रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे.
स्वच्छ मिशन अंतर्गत लोकजागृतीला फटका
बुलडाणा : घरोघरी शौचालय असावे व त्याचा नियमित वापर व्हावा, पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असा संदेश कला पथकाच्या माध्यमातून देण्यात येतो. परंतु, स्वच्छ मिशन अंतर्गत लोकजागृती कार्यक्रमाला सध्या कोरोनामुळे फटका बसला आहे.
वातावरणात बदल; शेतकरी चिंताग्रस्त
मेहकर : तालुक्यात दोन दिवसांपासून हवामानात बदल झाला आहे. ढगाळ वातावरणही निर्माण झाल्याने पावसाची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सध्या गहू काढणी अंतिम टप्प्यात आहे. परंतु, वातावरणातील बदलामुळे गहू उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त दिसून येत आहेत.
निर्जंतुकीकरण फवारणी करावी!
बुलडाणा : शहरात कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे शहरात नगरपालिका प्रशासनाच्यावतीने निर्जंतुकीकरण द्रावण फवारण्याची मागणी होत आहे. तर नाल्यांवर ब्लिचिंग पावडर शिंपडण्यात यावी.
मूर्ती ग्रामपंचायतीचा स्वच्छतेवर भर!
मोताळा : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोमवारी ग्रामपंचायत प्रशासनाकडून स्वच्छतेस प्राधान्य देण्यात आले. गावातील मोकळ्या जागांसह नाल्या आणि विविध परिसरात दुसऱ्यांदा निर्जंतुकीकरण द्रावणाची फवारणी करण्यात आली.