लोकमत न्यूज नेटवर्कशेगाव : विकास आराखड्यांतर्गत संत गजानन महाराज मंदिरात येणा-या भाविकांसाठी पार्किंगस्थळ निर्मितीसाठी अखेर शुक्रवारी सकाळी खलवाडी भागातील १९ व मातंगपुरीतील १७ असे ३६ दुकाने व घरे जमीनदोस्त करण्यात आली. ही कारवाई उच्च न्यायालयाच्या आदेशाने प्रशासनाने केली. शेगाव विकास आराखड्यांतर्गत अनेक कामे गेल्या काही वर्षांपासून नागरिकांचे सहकार्य मिळत नसल्याने प्रलंबित आहेत. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ५ एप्रिल रोजी दिलेल्या निर्णयाप्रमाणे विकास आराखड्यांतर्गत खलवाडी भागात पार्किंग करण्याकरिता त्याठिकाणी वसलेल्या १९ दुकानदारांना बाजारातील बांधलेल्या नगर परिषद संकुलातील दुकाने गजानन महाराज संस्थानने प्रत्येकी २२ लाखप्रमाणे भरलेले आहे. ती दुकाने या व्यावसायिकांना खरेदीखत प्रमाणे त्यांच्या नावावर करून मातंगपुरीतील १७ घरे, दुकानदारांना दुकानाचे अर्धे गाळे नगरपालिकेने नऊ महिन्यात बांधून द्यावे, तोपर्यंत त्यांना दर महिन्याला ५ हजार रुपये महिना द्यावा, असा निर्णय दिला. त्यानुसार २७ एप्रिलला ही प्रतिष्ठान व घरे जमीनदोस्त करण्यासाठी आयुक्तांच्या निर्देशाप्रमाणे २६ एप्रिलला याविषयी पूर्ण आखणी करण्यात आली. २७ एप्रिलच्या सकाळी शेगाव शहरातील आंबेडकर चौकाकडे येणारी वाहतूक वळवण्यात आली. काही ठिकाणी बॅरिकेट्स लावण्यात आले. दुकानासमोरील एक बाजू कापडाच्या उंच कनाती लावून झाकण्यात आली होती, तर या मार्गावरील सर्व रहदारी बंद करण्यात आली. शिवाय विद्युत पुरवठासुद्धा खंडित करण्यात आला. शांतता व सुव्यवस्थेच्या दृष्टीने ठिकठिकाणी पोलीस दलाच्या राखीव तुकड्याचे जवान, पोलीस पथकातील वाहने, वॉटर फोर्स वाहन, रुग्णवाहिका तैनात ठेवण्यात आल्या होत्या. दरम्यान, मातंगपुरी वस्तीतील गायत्री मंदिरसुद्धा पाडण्यात आले. त्यामुळे भाविकांचे डोळे पाणावले होते.
आजची कारवाई पूर्ण झाली असून, पुढील कारवाई उच्च न्यायालय व आयुक्तांच्या निर्देशानुसार केली जाईल. - अतुल पंत, मुख्याधिकारी, शेगाव.