लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर: तालुक्यातील चिंचाळा येथील आदिवासी आश्रम शाळेतील १२ विद्यार्थीनींना विषबाधा झाल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. या विद्यार्थीनींवर मेहकर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सर्व मुलींची प्रकृती धोक्याबाहेर असून, अन्नातून विषबाधा झाल्याचा अंदाज वैद्यकीय सुत्रांनी व्यक्त केला.तालुक्यातील चिंचाळा येथील जिजामाता आदिवासी निवासी आश्रम शाळेत १ ते १२ पर्यंत ३८३ विद्यार्थी निवासी राहून शिक्षण घेत आहेत. १४ डिसेंबरच्या संध्याकाळी ८ च्या दरम्यान येथील ३ मुलींच्या पोटात तीव्र वेदना आणि दातखिळ्या बसने सुरू झाले. तेव्हा शाळेतील तीन मुलींना १४ डिसेंबरच्या रात्री प्राथमिक आरोग्य केंद्र डोणगाव येथे आणले असता प्रथमोपचार करून शाळेत मुलींना परत नेले. मात्र रविवारच्या च्या सकाळी त्यातील दोन व आणखी एक अश्या तीन विद्यर्थीनींना डोणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले असता त्यांना तेथून मेहकर येथील खाजगी रुग्णालयात उपचारा साठी दाखल केले. नंतर रविवारच्या संध्याकाळी डोणगाव येथील एका खाजगी दवाखान्यात २ मुली भरती केल्या. त्यांच्यावर उपचार सुरू होते न होतेच तोच आणखी दोन विद्यर्थीनींची प्रकृती बिघडली. त्यांना सुद्धा त्याच खाजगी रुग्णालयात दाखल केले. चिंचाळा येथील जिजामाता आदिवासी निवासी आश्रम शाळेतील १२ मुलींवर येथील डॉ. पंजाबराव शेजोळ यांच्या दवाखान्यात उपचार सुरू आहे. सद्यस्थितीत मुलींची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती आहे. पुढील तपास मेहकर पोलिस करीत आहेत. या घटनेची माहीती मिळताच कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती माधवराव जाधव, शिवसेना तालुका प्रमुख सुरेश वाळुकर, दिलीप देशमुख, गटशिक्षणाधिकारी मधुकर वानखेडे, केंद्र प्रमुख सुरेश चव्हाण, आदिवासी विकास विभागाचे शिक्षण अधिकारी भोपळे यांनी विद्यार्थीनींची भेट घेतली. पोलीस तपास सुरूयावर खाजगी दवाखान्यात पोलीस प्रशासन पोहचून ठाणेदारांनी या प्रकरणी सर्व माहिती जाणून घेतली. महिला पोलिसांना सुद्धा दवाखान्यामध्ये विद्यार्थीनींच्या सुरक्षेसाठी ठेवण्यात आल्याची माहिती ठाणेदार आत्माराम प्रधान यांनी दिली.
सर्व विद्यार्थीनींवर सध्या उपचार सुरू आहे. सर्व विद्यार्थीनी निगराणीमध्ये आहेत. या प्रकरणात स्त्री रोगतज्ञांचा सल्ला घेतला आहे.- डॉ. पंजाब शेजोळ,मेहकर.