बुलडाणा : खाद्यपदार्थांमधील भेसळसह इतर महत्त्वाची कामे असलेल्या अन्न व औषध प्रशासन विभागाकडे गत काही वर्षांपासून शासनाचे दुर्लक्ष हाेत आहे. त्यामुळे या विभागात अनेक पदे रिक्त असल्याने बुलडाणा जिल्ह्यातील २६ लाख लाेकांची अन्नसुरक्षा धाेक्यात आली आहे.
अन्न व औषध प्रशासन विभागाकडे संपूर्ण जिल्ह्यातील मेडिकल , हाॅटेल यांची तपासणी करण्याचे महत्वाचे काम असते. या विभागात गत काही वर्षांपासून महत्त्वाची पदे रिक्त आहेत. बुलडाणा कार्यालयात २०११ मध्ये अन्नसुरक्षा अधिकाऱ्यांची ११ पदे मंजूर हाेती. कालांतराने ही पदे तीनवर मर्यादित करण्यात आली आहे. दुसरीकडे हाॅटेल आणि मेडिकलची संख्या वाढतच आहे. जिल्ह्यात १० हजार ८०६ नाेंदणीकृत हाॅटेल आहेत. तसेच इतर १ हजार ५२६ हाॅटेल आहेत. तसेच १ हजार ८५६ मेडिकल आहेत. यापैकी ५टक्के मेडिकलची तपासणी करण्याचे लक्ष्य देण्यात देण्यात येते. बुलडाणा येथील कायार्यालयात केवळ एकच अन्नसुरक्षा अधिकारी कार्यरत आहेत. त्यामुळे, १३ तालुक्यांतील मेडिकलचे तपासणी कशी करणार? असा प्रश्न पडलेला आहे. बुलडाणा कार्यालयात शिपायांची चार पदे मंजूर आहेत. चारही रिक्त आहेत. नमुना सहायकांची दाेन पदे रिक्त आहेत. त्यामुळे कारवाई करण्यावर मर्यादा येत असल्याचे चित्र आहे.
२५,८६,२५८
जिल्ह्याची लाेकसंख्या
३६ मेडिकलवर कारवाई एकाचा परवाना केला रद्द
एप्रिल ते आतापयर्यंत अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने ५५५ मेडिकलची तपासणी करण्यात आली आहे. यापैकी ३६ मध्ये अनिमितता आढळल्याने कारवाई करण्यात आली आहे. तसेच एकामध्ये गंभीर स्थिती असल्याने परवाना रद्द करण्यात आला आहे.
मेडिकलची हाेते तपासणी
जिल्ह्यातील १८५६ मेडिकल आहेत. त्यापैकी ५ टक्के मेडिकलची तपासणी करण्याचे उद्दिष्टे देण्यात येते. कर्मचारी कमी असल्यामुळे प्रत्येक मेडिकलची तपासणी शक्य नसल्याने काही गावांमध्ये भेटी देऊन तपासणी करण्यात येते.
नियमित तपासणीसाठी कर्मचारीच नाही
n जिल्ह्यात हाॅटेलांची संख्या पाहता नियमित तपासणी करणे शक्य नाही. त्यामुळे, तक्रारी आलेल्या आणि काही गावांची निवड करून तपासणी करण्यात येते. सर्वच हाॅटेलाची तपासणी करणे कर्मचारी नसल्याने शक्य नसल्याचे चित्र आहे.