बुलडाणा: शालेय साहित्य, गणवेश व इतर कुठल्याही वस्तू आपल्याच शाळेतून घेण्याची सक्ती होत असेल तर पालकांनी वेळीच सावधानता बाळगणे गरजेचे आहे; अशा कुठल्याही प्रकारची शालेय साहित्य खरेदीची सक्ती शाळेला करता येत नाही. आपल्याच शाळेतून शालेय साहित्य खरेदी करण्यासाठी पालकांना वेठीस धरणाºया शाळांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती, माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. श्रीराम पानझाडे यांनी शुक्रवारी ‘लोकमत’शी बोलताना दिला. शैक्षणिक क्षेत्रात कॉन्व्हेंट संस्कृतीने आपले पाय घट्ट रोवले आहेत. पालकांचा इंग्रजी शाळांकडे वाढता कल पाहून गावोगावी कॉन्व्हेंट व सीबीएसई माध्यमाच्या शाळा उघडण्यात आल्या आहेत. शहरी भागातच नव्हे, तर ग्रामीण भागातही इंग्रजी माध्यमाच्या विनाअनुदानित अनेक संस्था सुरू आहेत. खाजगी शाळांचे नवीन शैक्षणिक सत्र सुरू झाले आहेत. सध्या अनुदानित, विनाअनुदानित, स्वयंअर्थसाहाय्यित, कायम विनाअनुदानित, खासगी प्राथमिक शाळांमध्ये प्रवेशप्रक्रिया वेगात सुरू आहे. अनेक शाळांकडून प्रवेश देतानाच विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यासाठी सांगितले जाते. परंतू काही शाळा वह्या पुस्तकांसह गणवेश लेखनसाहित्य अशा विविध प्रकारचे शैक्षणिक साहित्य आपल्याच शाळेतून खरेदी करण्यासाठी सक्ती करत आहेत. त्यामुळे पालकांवर आर्थिक भुर्दंड पडत आहे. आपल्याच शाळेतून किंवा आपण सांगितलेल्याच दुकानातून शैक्षणिक साहित्य खरेदीची सक्ती ज्या शाळांकडून केली जात असेल, अशा शाळांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. श्रीराम पानझाडे यांनी दिला आहे. शेगावातील ‘त्या’ शाळाही रडारवरशेगाव शहरातील व तालुक्यातील काही संस्थामध्ये पालकांना शालेय साहित्य आपल्याच शाळेमधून खरेदी करण्याची सक्ती केल्या जात आहे. त्यावर काही पालकांनी गटशिक्षणाधिकाºयांकडे तक्रार केलेली आहे. त्यानुसार गटशिक्षणाधिकाºयांनी शैक्षणिक संस्थांना पत्र पाठविलेले आहे. परंतू तरीसुद्धा शाळेकडून पालकांची सर्रास लूट सुरू आहे. शेगावातील अशा काही शाळा शिक्षण विभागाच्या रडारवर असून लवकरच नियम मोडणाºया शाळांवर कारवाई होईल, अशी माहिती शिक्षणाधिकारी पानझाडे यांनी दिली आहे.
शालेय साहित्य आपल्याच शाळेतून किंवा शाळेने सांगितलेल्या दुकानातूनच खरेदी करण्याची सक्ती होत असले, तर त्या शाळांवर शिस्तभंगाची कारवाई, मान्यता रद्द करणे, शाळेवर दंड ठोकावणे अशी कारवाई करण्यात येईल. वेळ पडल्यास अशा शाळांची आरटीईची मान्यता रद्द करण्याची शिफारस शासनास पाठविण्यात येईल. - डॉ. श्रीराम पानझाडे, माध्यमिक शिक्षणाधिकारी, बुलडाणा.