लोणार/ सुलतानपूर: लाेणार तालुक्यातील वडगाव तेजन येथे तीन सराईत चोरट्यांनी चार घरात घुसून सुमारे ६७ हजार रुपयांचा मुद्देमाल लुटला. यातील एका घरात वृद्ध दांपत्याचे हातबाय बांधून, तोंडात बोळा कोबून चोरट्यांनी दागिने व अन्य साहित्य चोरेल. याघटनेमुळे वडगाव तेजन परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ४ सप्टेंबरच्या पहाटे ही जबरी चोरीची घटना घडली.
शेगाव-पंढरपूर दिंडी मार्गावर आणि लोणार शहरापासून दहा किमीच्या अंतरावर असलेल्या वडगाव तेजन येथे गावालगतच रहात असलेल्या रामकिनस रामराव जेतनकर (६९) यांच्या घरात तीन सशस्त्र चोरटे घुसले. घराच्या पाठीमागील दाराचा कडी कोयंडा तोडून त्यांनी आत प्रवेश केला. रामकिसन तेजनकर व त्यांच्या पत्नीना चोरट्यांनी दोरीने बांधून गळ्याला चाकू लावत नगदी पाच हजार रुपयांसह सोन्या-चांदीचे दागीने असा ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल लुटला. सोबतच लगतच सैन्य दलात कार्यरत असलेले नारायण कुलाल यांच्या घरातील सिसीटीव्हीची तोडफोड करत चोरी केली.
जुन्या गावातील विशाल रमेश तेजनकर व इंदुबाई त्र्यंबक मानवतकर यांच्या घरातील सोने व रोख रक्कमही ही चोरट्यांनी लंपास केली. प्रातमिक अंदाजानुसार ६७ हजार रुपायंचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे. यात प्रसंगी वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान या जबरी चोरीट्या घटनेच्या पार्श्वभूमीवर परिसरात पोलिसांनी गस्त वाढविण्याची गरज व्यक्त होत आहे.
श्वान पथकानेही केली पाहणीजबरी चोरीच्या घटनेची माहिती मिळाल्यानंतर बुलढाणा येथून श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञांच्या पथकाने चारही घरांच्या ठिकाणी पहाणी करत आवश्यक ते नमुने गोळा केले. श्वानानेही चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात त्याला फारसे यश आले नाही. चोरीच्या घटनेची माहिती मिळाल्यानंतर एसडीपीअेा प्रदीप पाटील, पोलिस निरीक्षक निमिष मेहेत्रे, पोलिस उपनिरीक्षक घोगरे, पोलिस कॉन्स्टेबल रोहिदास जाधव, संतोष चव्हाण, गणेश लोढे, गजानन दराडे, ज्ञानेश्वर शेळके यांनीही घटनास्थळाची पाहणी केली. रामकिसन तेजनकर यांच्या तक्रारीवरून लोणार पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.