यंदा पाऊस जास्त झाल्याने कोराडी प्रकल्पाचे पाणी सुटले. त्यामुळे या परिसरात गव्हाचा पेरा मोठ्या प्रमाणात झाला होता. त्यामुळे हरियाणा व पंजाब या राज्यातून परिसरात दाखल झालेल्या हार्वेस्टरद्वारा गहू सोंगणी हंगामाला वेग आला आहे. एकाच वेळी सर्वांचा सोंगणीला आलेला गहूह आणि वारंवार होणाऱ्या वातावरणातील बदलामुळे प्रत्येकाला आपला गहू काढण्याची घाई झाली असल्याने हार्वेस्टरची मागणी वाढली आहे. त्यामुळे गतवर्षी पंधराशे रुपये एकर गहू सोंगणीचे भाव यंदा २ हजार रुपये एकरावर गेले आहेत. शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात वाढ झाल्याचे शेतकरी सांगत आहेत.
वातावरणातील बदलामुळे गहू उत्पादनात घट!
गव्हाचे पीक फुलोऱ्यात असताना वातावरणात धुक्याचे प्रमाण आणि सोंगणीला आला असताना वादळी पावसामुळे झालेली पिकांचे नुकसान यामुळे गहू उत्पादनात घट आली आहे. दरवर्षी एकरी १८ ते २० क्विंटल होणाऱ्या गव्हाचे उत्पादन या वर्षी निम्याने कमी होऊन ते एकरी १० ते १२ क्विंटलवर आले आहे.
शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ!
बी-बियाणे, खते, औषधीच्या वाढत्या किमती सोबतच मजुरीत झालेली वाढ यामुळे उत्पादन खर्च वाढून वातावरणातील नेहमीच्या अवेळी बदलामुळे सोयाबीन, तूर, हरभरा या पिकासोबतच गहू उत्पादनातही कमालीची घट येत आहे. आर्थिक बजेट बिघडल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाल्याचे दिसून येत आहे.