बुलडाणा : लाकडाची वाहतूक करणारे वाहन सोडण्यासाठी ६ हजार रुपये दंडासह १९ हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या जळगाव जामोद येथील वनपरीक्षेत्र अधिकारी भगतराम द्वारकादास कटारिया (४७) यास बुलडाणा लाचपुतपत प्रतिबंधक विभागाने १३ मे रोजी दुपारी वनपरीक्षेत्र कार्यालयात रंगेहात पकडले. दरम्यान या कारवाईमुळे वनविभागात खळबळ उडाली आहे. यासंदर्भात जळगाव जामोद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरा पर्यंत सुरू होती. अटक करण्यात आलेला आरोपी भगतराम द्वारकादास कटारिया हा अकोला जिल्ह्याील अकोट येथील गजानन नगरमध्ये राहणार आहे.
१० मे रोजी लाकडाची वाहतूक करणारे एक वाहन वनविभागाचे कर्मचारी देवकर यांनी पकडून वनपरीक्षेत्र अधिकारी कार्यालयात जमा केले होते. हे वाहन सोडण्यासाठी वनपरीक्षेत्र अधिकारी कटारिया यांंची भेट तक्रारकर्त्या वाहन मालकाने घेतली होती. तेव्हा वनपरीक्षेत्र अधिकारी कटारिया यांनी स्वत:साठी ७ हजार रुपये आणि इतरांसाठी १२ हजार रुपये व दंडाची रक्कम ६ हजार रुपये अशी एकूण २५ हजार रुपयांची मागणी केली होती. लाच द्यावयाची नसल्याने वाहन मालकाने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्या आधारावर १३ मे रोजी सापळा रचून लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने आधी पडताळणी करत वनपरीक्षेत्र अधिकारी (वर्ग २) भगतराम द्वारकादास कटारिया यास ही २५ हजारांची रक्कम वनपरीक्षेत्र कार्यालयात घेतांना रंगेहात पकडले.
ही कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे बुलडाणा येथील पोलिस उपअधीक्षक संजय चौधरी, पोलिस हेडकॉन्स्टेबल विलास साखरे, पोलिस नायक मोहम्मद रिजवान, रविंद्र दळवी, प्रवीण बैरागी, पोलिस शिपाई अझरुद्दीन काझी, चालक अर्शद शेख यांनी १३ मे रोजी दुपारी केली. दरम्यान वृत्त लिहीपर्यंत यासंदर्भात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती, अशी माहिती लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या सुत्रांनी दिली.
अलिकडील काळातील मोठी कारवाई
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने वनविभागातील वर्ग दोनच्या अधिकाऱ्याला ऐवढी मोठी रक्कम लाच म्हणून स्वीकारतांची ही अलिकडील काळातील मोठी कारवाई आहे. यामुळे वनविभागाचे जळगाव जामोद, संग्रामपूर पट्ट्यातील कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.