माेताळा : अवैध वाळूची वाहतूक करणारे ट्रॅक्टर अडवल्याने वाळूमाफियांनी वन कर्मचाऱ्यास मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली़. ही घटना ७ मे राेजी चिंचखड नाथ शिवारात घडली़. याप्रकरणी बाेराखेडी पाेलिसांनी पाचजणांविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे़.
वन विभागाच्या महिला वन कर्मचारी यांना ७ मे रोजी सकाळी चिंचखेड नाथ बीटमधून अवैध वाळूची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. या माहितीआधारे वन कर्मचारी शरद घुगे, आशिष बगळे, ए. एन. सपकाळ व वनमजूर पी. टी. बज्जर यांना सोबत घेऊन सकाळी दहाच्यासुमारास चिंचखेड नाथ शिवारात गेले. यावेळी वन कर्मचाऱ्यांचे पथक अवैध वाळू भरणाऱ्या ट्रॅक्टरची वाट पाहात दबा धरून बसले. बारा ते साडेबाराच्यासुमारास वनपरिक्षेत्राच्या हद्दीत नाल्यात एक ट्रॅक्टर अवैध वाळू भरताना दिसून आला. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी अवैध वाळूने भरलेले ट्रॅक्टर व त्याचा चालक कल्पेश ठाकरे यास ताब्यात घेतले. या घटनेची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी यांना दिली. माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी नेहा मुरकुटे या धनंजय पोटे, सतीश राठोड, पूनम चव्हाण, पी. पी. मुंढे, एस. पी. कुशोड या वन कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन मदतीसाठी घटनास्थळी दाखल झाल्या. वाळूने भरलेला ट्रॅक्टर मोताळा येथे आणत असताना खरबडी फाटा येथे दुपारी अडीचच्या सुमारास गोपाल ठाकरे हा चार लोकांना घेऊन तेथे आला. यावेळी त्याने वन कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालत कॉलर पकडली. त्यावेळी महिला वन कर्मचाऱ्याने मध्यस्थी केली असता, याप्रकरणी महिला वन कर्मचाऱ्याच्या तक्रारीवरून गाेपाल ऊर्फ राहुल संताेष ठाकरे, श्रीकृष्ण बघे, सागर बाबूराव पाटाेळे, अंकुश दिलीपराव ठाकरे व अन्य एकाविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे़. पुढील तपास बाेराखेडी पाेलीस करीत आहेत़.