मासरूळ : श्री शिवाजी विद्यालय येथे अहिल्याबाई होळकर जयंती साजरी केली नसल्याची तक्रार शाळा समिती सदस्याने केली आहे. या प्रकरणाची चाैकशी करून दाेषींवर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
अंगणवाडी, जिल्हा परिषद शाळा संस्था, महाविद्यालय आदी प्रत्येक शासकीय व निमशासकीय कार्यालयात ३१ मे रोजी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्याचे शासनाचे आदेश हाेते. तरीही श्री शिवाजी विद्यालय शाळा मासरूळ येथे जयंती साजरी करण्यात आली नसल्याचा आराेप ग्रामस्थांनी केला आहे. याविषयी शाळेच्या लिपिकांना विचारणा केली असता त्यांनी मुख्याध्यापकांचे आदेश नसल्याने जयंती साजरी केली नसल्याचे सांगितले. विद्यालयातून अनेक विद्यार्थ्यांना कागदपत्रे मिळत नसल्याचा आराेपही ग्रामस्थांनी केला आहे. या प्रकरणाची चाैकशी करून दाेषींवर कारवाई करण्याची मागणी पंचायत समिती सदस्य दिलीप शिनकर, नंदकिशोर देशमुख, बाळू सपकाळ, किरण उगले, मधुकर महाले, सुभाष पवार, सुनील सावळे, संदीप सपकाळ, दादाराव सावळे, दीपक किटे, शिवाजी किटे, गजानन सावळे, संभाजीराव देशमुख, मधुकर सिनकर, राहुल शिनकर, संदीप कारंजकर आदी नागरिकांनी केली आहे.
यानंतर प्रत्येक महापुरुषाच्या जयंती आम्ही विद्यालयात साजऱ्या करू व शाळेची विद्यार्थ्यांना लागणारी कागदपत्रे त्वरित उपलब्ध करून देऊ. शाळेच्या वेळापत्रकानुसार विद्यालयात हजर राहू व कनिष्ठ लिपिक यांच्यावर नियमानुसार कारवाई करू.
- एम. के. भोंडणे, प्रभारी मुख्याध्यापक, श्री शिवाजी विद्यालय मासरूळ