मोताळा, दि. १४- तालुक्यातील टाकळी (वाघजाळ) येथील जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा आता कात टाकत असून, आयएसओच्या दिशेने वाटचाल करीत आहे. यासाठी शाळेचे माजी विद्यार्थी तथा बुलडाणा येथे कार्यरत वर्ग १ चे अधिकारी संतोष लांडे यांनी शाळेला ११ हजार रुपयांची देणगी देऊन तालुक्यासाठी एक नवा आदर्श निर्माण केला.मोताळा तालुक्यात ज्ञानरचनावाद व डिजिटल शाळेचे वारे वाहत असून, यासाठी तालुक्यातील शिक्षकांची भूमिका महत्त्वाची ठरत आहे. अनेक शिक्षक पदरमोड करीत जास्तीचा वेळ देऊन शाळा सुंदर व गुणवत्तापूर्ण करण्यासाठी परिङ्म्रम घेत आहेत. ग्रामस्थांच्या मदतीसह लोकसहभागाचा वाटाही तितकाच महत्त्वाचा ठरत आहे. टाकळी येथील जिल्हा परिषदेची शाळासुद्धा भौतिक व शैक्षणिक प्रगती साधत गुणात्मकदृष्ट्या विविध अभ्यासक्रमाने नटली आहे. शाळेच्या यशस्वी वाटचालीसाठी मुख्याध्यापक अशोक राजनकर व वर्षा राजनकरसह ग्रामस्थांच्या लोकसहभागातून टाकळीची शाळा गुणवत्तेचा कास धरत आहे. शनिवारी बुलडाणा येथील संतोष लांडे यांनी मुलगा अजिंक्य सोबत शाळेला सदिच्छा भेट दिली. यावेळी मुलाच्या वाढदिवसाची ११ हजाराची रक्कम मुख्याध्यापक राजनकर यांच्या सुपूर्द करत शाळा आयएसओ करण्यासाठी पुढाकार घेत असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या. या प्रसंगी शाळा व ग्रामस्थांच्यावतीने संतोष लांडे यांचा सत्कार करण्यात आला. गटशिक्षणाधिकारी मोरे, केंद्र प्रमुख पवार, अरिवंद मारोळकर यांच्या मार्गदर्शनात शाळेची प्रगतीपथाकडे वाटचाल सुरू आहे.
माजी विद्यार्थ्याने जपली सामाजिक बांधीलकी
By admin | Published: March 15, 2017 1:11 AM